लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा पोलीस मुख्यालयात दोन कोरोनाबाधित रुग्ण सापडताच पोलीस अधीक्षक कार्यालय हादरून गेले. जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग यांनी शनिवारी तातडीने मुख्यालयातच ॲंटिजेन चाचणीसाठी यंत्रणा उभारली. शनिवारी ३७ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून, सर्व चाचणींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. सध्या संचारबंदीच्या काळात पोलीस अहोरात्र रस्त्यावर थांबून काम करीत आहेत. अशातच पोलीस दलातील कर्मचारी पाॅझिटिव्ह सापडल्याने पोलिसांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दाेन कर्मचारी पाॅझिटिव्ह आढळल्यानंतर मुख्यालयात पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची ॲंटिजेन चाचणी करण्यात आली.
काही कारणांनी पाेलीस दलातील ज्यांचे लसीकरण झालेले नाही. त्यांचेही लसीकरण लवकरात लवकर करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग यांनी सांगितले. तत्कालीन पोलीस अधीक्षक डाॅ. प्रवीण मुंढे हे स्वत: कोरोनाबाधित झाले होते. त्यानंतर त्यांनी पोलीस विभागीतील कर्मचारी व त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी मुख्यालय परिसरात कोविड सेंटरची उभारणी केली होती. कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने हे सेंटर बंद करण्यात आले होते. पाेलीस कर्मचारी काेराेनाबाधित आढळल्याने हे सेंटर पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती डाॅ. माेहितकुमार गर्ग यांनी दिली.
....................................
पोलीस दलातील कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्यानंतर त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचीही काळजी घेण्यात येते. दररोज पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचीही विचारपूस केली जाते.
- डाॅ. मोहितकुमार गर्ग, जिल्हा पोलीस अधीक्षक, रत्नागिरी.
.....................................
फोटो कॅप्शन : पोलीस मुख्यालयात कोरोना रुग्ण आढळल्याने शनिवारी जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी व अधिकारी यांची ॲंटिजेन टेस्ट करण्यात आली. (छाया : तन्मय दाते)
फोटो नंबर ६६९६,६६९८