तन्मय दातेरत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील वाहतूक सुरक्षित व शिस्तीत व्हावी यासाठी जिल्हा वाहतूक विभागाकडून वाहतुकीच्या विविध नियमांची कडक अंमलबजावणी केली जात आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये १०२० लोकांवर कारवाई करण्यात आली असून, त्यात हेल्मेट न घातलेल्या ७६४ जणांचा तर सीटबेल्ट न वापरणाऱ्यांवर २५६ जणांचा समावेश आहे. त्यांना ४ लाख ३३ हजारांचा दंड करण्यात आला आहे.जिल्ह्यामध्ये हेल्मेट सक्ती असावी की नसावी याबाबत वेगवेगळी मते व्यक्त होत असली तरी सध्यातरी हेल्मेटचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. लॉकडाऊन काळात त्याची काटेकोर तपासणीही करण्यात येत होती. यामुळे पोलिसांना मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त झाला होता. लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आल्यानंतरही हीच नियमांची काटेकोर अंमलबजावणी कायम ठेवली.
त्यामुळेच फेब्रुवारी महिन्यात विनाहेल्मेट वाहनचालक आणि सीटबेल्ट न लावलेल्या वाहनचालकांवर केलेल्या कारवाईतून जिल्हा वाहतूक विभागाला ४,३३,२०० इतका महसूल प्राप्त झाला. त्यामध्ये हेल्मेट न वापरणाऱ्या ७६४ जणांकडून ३ लाख ८२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तर सीटबेल्ट न वापरणाऱ्या जिल्ह्यातील २५६ जणांना ५१ हजार २०० रुपये इतका दंड करण्यात आला आहे. ही कारवाई अशीच पुढेही केली जाणार आहे.कारवाईपेक्षा लोकांनी स्वत:हून हेल्मेट व सीटबेल्ट वापरावा. हेल्मेट हे लोकांच्या सुरक्षिततेसाठी आहे. त्याचा दुचाकी चालकांनी वापर करणे आवश्यक आहे. लोकांनी स्वत:च्या सुरक्षिततेसाठी व कुटुंबासाठी हेल्मेट वापरावे. कायद्याने बंधनकारक करण्यापेक्षा लोकांनी स्वत:हून अशा गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे.शिरीष सासने, वाहतूक पोलीस निरीक्षक, रत्नागिरी