रत्नागिरी : माजी खासदार अनंत गीते समर्थक म्हणून ओळखले शिवसेनेचे दापोली विधानसभा क्षेत्र प्रमुख संदीप राजपुरे, उपजिल्हाप्रमुख शंकर कांगणे, खेडचे तालुकाप्रमुख दत्ताराम गोठल आणि युवा सेना तालुका अधिकारी विकास जाधव अशा चार शिवसेना प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अनंत गीते शिवसेनेतून बाहेर पडणार असल्याची चर्चा गेले महिनाभर दबक्या आवाजात सुरू आहे. आता त्यांच्या जवळच्या मानल्या जाणार्या चौघांनी राजीनामा दिल्यामुळे पुढील काही काळात मोठ्या घडामोडी घडणार असल्याची शक्यता आहे.गेले महिना, दोन महिने शिवसेनेत अंतर्गत घडामोडी वेगाने घडत आहेत. माजी मंत्री रामदास कदम यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे ते आता पुढे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच अलिकडेच रायगड जिल्ह्यातील एका कार्यक्रमात अनंत गीते यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. महाविकास आघाडी सत्तेत असताना अनंत गीते यांनी अशी टीका करणे चुकीचे असल्याच्या प्रतिक्रिया राष्ट्रवादीकडून व्यक्त झाल्या होत्या. त्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे किंवा पक्षातील कोणत्याही नेत्याकडून काहीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. मात्र याच घडामोडींमुळे अनंत गीते शिवसेनेतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चाही वाढल्या. राजकीय वर्तुळात या चर्चा दबक्या आवाजात सुरू आहेत.या पार्श्वभूमीवर मंगळवारी चार पदाधिकार्यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाप्रमुखांकडे दिला आहे. त्यांनी राजीनामा कोणत्या कारणासाठी दिला, याची माहिती अजूनही पुढे आलेली नसून, त्या चौघांनीही आपली प्रतिक्रिया दिलेली नाही.
शिवसेनेत खळबळ! पवारांवर थेट टीका करणाऱ्या माजी खासदाराच्या समर्थकांचे तडकाफडकी राजीनामे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 2:32 PM