चिपळूण : मॉलमध्ये कॉन्ट्रॅक्ट मिळवून देतो, तसेच चारशे बेरोजगार तरुणांना नोकरी देतो, असे आमिष दाखवत चिपळुणातील तरुणाने नाशिकच्या इगतपुरी भागात सुमारे २९ लाख ५० हजार रुपयांचा फसवणूक केल्याप्रकरणी चिपळूणच्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. दिनेश गणपत पवार (सध्या रा.गिरणारे, इगतपुरी) असे या संशयित आरोपीचे नाव असून, तो मूळचा चिपळूण तालुक्यातील ओमळी पवारवाडी मारुती मंदिराजवळील रहिवासी आहे.या प्रकरणी शंकर आनंदा उबाळे (वय ४२, रा.खालची पेठ, गणपती मंदिराजवळ, इगतपुरी) यांनी इगतपुरी पोलिस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, संशयित आरोपी दिनेश पवार याने २०१६ पासून इगतपुरी शहरातील रहिवासी शंकर उबाळे व संदीप काशिनाथ फोडसे, पोपट बुधा भले यांच्याशी मैत्री केली.तुम्हाला एका मॉल कंपनीचे मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळवून देतो, असे सांगून त्यांच्याकडून १५ लाख ५० हजार रुपये बँक खात्यातून ग्रीन रेबीड कार्डद्वारे घेतले, तसेच नोकरी देतो, असे सांगून चारशे बेरोजगार तरुणांकडून प्रत्येकी ३ हजार ५०० रुपये, याप्रमाणे १४ लाख रुपये जमा करून, एकूण २९ लाख ५०० हजार रुपयांची फसवणूक केली, असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फसवणूक झालेल्यांमध्ये चारशे बेरोजगार तरुण व तीन हातमजूर आहेत. यामध्ये मोठे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
चारशे बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष, २९ लाखांची फसवणूक केल्याच्या आरोपावरुन चिपळूणमधील एकास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2023 11:48 AM