खेड : एक कोटी रुपयांचा फ्लॅट ५० लाखांत देतो असे सांगून दोन भावांनी एका व्यावसायिकाला तब्बल ४२ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार खेडमध्ये घडला आहे. अविनाश दामोदर वैद्य यांनी याबाबत फिर्याद दिली असून, शरद आणि सुनील पांडुरंग सोंडकर या निगडे (ता. खेड) येथील सख्ख्या भावांना पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली आहे. त्यांना ९ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश खेड न्यायालयाने दिले आहेत.अविनाश वैद्य हे खेड शहरातील व्यावसायिक आहेत. मूळचे निगडी येथील आणि कामानिमित्त मुंबईत राहणाऱ्या शरद आणि सुनील सोंडकर या भावांशी वैद्य यांची २०१४ साली ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर मैत्रीमध्ये झाले. या दोघांनी वैद्य यांचा विश्वास संपादन केला. मुंबईत दहिसर येथे एक फ्लॅट विकायचा आहे, त्याचे बाजारमूल्य एक कोटी रुपये इतके आहे आणि तो ५० लाख रुपयांत मिळेल, असा प्रस्ताव या दोघांनी वैद्य यांच्यासमोर ठेवला. ५ जून २०१४ ते २८ फेब्रुवारी २०१७ या काळात विश्वासाचे नाते निर्माण करून हा व्यवहार करण्याचे नाटक या आरोपींनी केले होते. या दोघांवर विश्वास बसल्यामुळे अखेर वैद्य यांनी या व्यवहाराला हिरवा कंदील दाखविला. हा व्यवहार करण्यासाठी वैद्य यांनी त्या दोघांना ४२ लाख रुपये टप्प्याटप्प्याने दिले.उर्वरित पैसे देण्याआधी आपल्याला सदनिका बघायची आहे, असे वैद्य यांनी वारंवार सांगितले. मात्र, त्यांना सदनिका दाखविण्यात आली नाही. त्यामुळे या व्यवहाराबाबत वैद्य यांना संशय आला. ४२ लाख रुपये देऊनही सदनिका आपल्या ताब्यात मिळत नसल्याने वैद्य यांनी शरद सोंडकर याच्याकडे आपल्या पैशाची मागणी केली. त्याने वैद्य यांना सेंट्रल बँक आॅफ इंडियाचा दहिसर शाखेचा धनादेश दिला. वैद्य यांनी तो बँकेत जमा केला. मात्र, पैशाअभावी तो वैद्य यांच्याकडे परत आला.आपली फसवणूक झाली असल्याची खात्री झाल्यानंतर वैद्य यांनी खेड पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी लगेचच शरद आणि सुनील सोंडकर यांना मंगळवारी रात्री अटक केली. बुधवारी त्या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना ९ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक आनंद पवार अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
खेडमधील व्यावसायिकाची ४२ लाखांची फसवणूक
By admin | Published: March 02, 2017 12:18 AM