रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या नऊ वर्षात केलेल्या कामांमुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला ४५ जागा मिळतील, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे यांनी रत्नागिरीमध्ये केला.भाजपच्या महाविजय २०२४ संकल्प यात्रेसाठी बावनकुळे रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या दौर्यावर आले आहेत. बुधवारी रायगड मतदार संघातील दौरा करुन ते रात्री रत्नागिरीत दाखल झाले. गुरुवारी सकाळी त्यांनी भाजपच्या वॉरियर्सशी संवाद साधला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने गेल्या नऊ वर्षात देशात अनेक योजना राबवल्या गेल्या आहेत. सर्वसामान्य लोकांसाठी, मध्यमवर्गीयांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. देशाला जगात सर्वोत्तम करण्यासाठी गेल्या नऊ वर्षात त्यांनी प्रयत्न केला आहे, त्यामुळेच देशातील लोकांना ते पुन्हा पंतप्रधान व्हावेसे वाटतात. आपण आतापर्यंत ३२ हजाराहून अधिक लोकांना भेटलो. त्यातील फक्त १३ लोक सोडून बाकी सर्वांनी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचेच नाव घेतले. राज्यातील ९० टक्के लोक त्यांच्या पाठीशी उभे आहेत. रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील भाजप महायुतीचा उमेदवार ५१ टक्के मते घेऊन विजयी होईल, असा आपल्याला विश्वास असल्याचे ते म्हणाले.प्रत्येक विधानसभा मतदार संघातील ६० हजार घरांपर्यंत पोहोचण्याचा म्हणजेच या मतदार संघातील साडेतुन लाख घरांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प वॉरियर्सच्या बैठकीत करण्यात आला आहे, असेही ते म्हणाले. मोदी यांच्या कार्यकाळातील योजना संपर्क ते समर्थन अशा अभियानातून लोकांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत. संपर्क करायचा आणि समर्थन मागायचे, अशी ही मोहीम आहे.शरद पवार यांनी पॅलेस्टाईनची बाजू घेत पंतप्रधानांवर टीका केली आहे. मात्र दहशतवादी हल्ला काय असतो, हे शरद पवार यांना माहिती आहे. ते मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रावरही दहशतवादी हल्ले झाले. त्यामुळे दहशतवाद्यांचे किती समर्थन करायचे, हे त्यांना कळायला हवे. त्यांनी पंतप्रधानांवर जी टीका केली आहे, त्याचा आपण निषेध करत असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या ४५ जागा निवडून येतील, भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा दावा
By मनोज मुळ्ये | Published: October 19, 2023 2:11 PM