चिपळूण : शहरातील पेठमाप येथील निसर्गरम्य वाशिष्ठी नदीकिनाऱ्यावर बुधवारी सायंकाळी ४ वाजल्यापासून शेरणे शोधण्याचा कार्यक्रम दोन तास चालला. यावेळी भाविकांची अलोट गर्दी केली होती. शहरातील गोवळकोट येथील गोविंदगडाच्या पायथ्याशी वसलेले श्री देवी करंजेश्वरी व श्री देव सोमेश्वर हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिध्द आहे. या देवस्थानच्या शिमगोत्सवात शेरणे काढणे, हा मुख्य कार्यक्रम असून, तो कोकणात प्रसिध्द आहे. बुधवारी सायंकाळी ४ वाजता देवस्थानच्या दोन्ही पालख्या पेठमाप येथील वाशिष्ठी नदीकिनारी मिरवणुकीने दाखल झाल्या. यावेळी शेरणे शोधण्याचा कार्यक्रम तितक्याच पारंपरिक पद्धतीने पार पडला. भाविकांनी आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी पिवळ्या कापडात नारळ व आपल्या नावाची चिठी बांधून कोणाच्याही न कळत पुरून ठेवली होती. यातील ७७पैकी ४६ शेरणे काढण्यात आली. या कार्यक्रमानिमित्त पेठमाप परिसराला जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. यानंतर सायंकाळी ७.३० वाजता दोन्ही पालख्यांनी पेठमापहून गोवळकोटकडे प्रयाण केले. या शिमगोत्सवातील भद्रे होम गुरुवारी सायंकाळी ७ वाजता लावण्यात आला. शेरणे कार्यक्रमावेळी होणारी गर्दी व गैरप्रकार रोखण्यासाठी पोलीस यंत्रणेने खबरदारी घेऊन पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला होता. बाजारपुलावरील व अन्य वाहतूक व्यवस्थाही चोख ठेवण्यात आली होती. (प्रतिनिधी)पेठमाप येथील वाशिष्ठी किनारी मिरवणुकीने करंजेश्वरी, सोमेश्वरच्या पालख्या दाखल.पारंपरिक पध्दतीने शेरणे शोधण्याची अनोखी प्रथा.
करंजेश्वरीच्या पालखीने शोधले ४६ शेरणे
By admin | Published: March 24, 2016 10:10 PM