रत्नागिरी : खरीप हंगामासाठी शासनाकडून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहेत. आतापर्यंत १,७६८ शेतकऱ्यांनी पीक क्षेत्राचा विमा उतरवला आहे. गतवर्षी केवळ १,३०० शेतकऱ्यांनी या याेजनेचा लाभ घेतला हाेता. मात्र, यावर्षी ४६८ शेतकऱ्यांची वाढ झाली असून, या याेजनेसाठी मुदतवाढ देण्यात आल्याने ही संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे.
शासनाने खरीप हंगाम २०२१साठी प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी दि. १५ जुलैपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र, केंद्र शासनाने शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी दि. ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. भातासाठी एका हेक्टरला ४५,५०० रूपये तर नाचणीसाठी २० हजार रूपये विमा संरक्षित रक्कम जाहीर केली आहे. हवामानातील घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पेरणीपासून काढणीपर्यंत पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना हातभार मिळावा, यासाठी योजना जाहीर केली आहे.
दोन वर्षांपूर्वी भात कापणीच्या हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे कापणी केलेल्या पिकाचे नुकसान झाले. बाधित शेतकऱ्यांना सरसकट विमा परतावा देण्याचा निर्णय शासनाने घेतला. तेव्हा प्रथमच रत्नागिरीतील शेतकऱ्यांना परतावा देण्यात आला होता. गतवर्षी जिल्ह्यातील १,३०० शेतकऱ्यांनी विमा उतरवला होता. पावसामुळे बाधित झालेल्या अडीचशे शेतकऱ्यांना १४ लाख रूपयांचा परतावा मिळाला होता.
कोकणात भाताचे उंबरठा उत्पादन ७० टक्केपेक्षा जास्त असल्याने विमा परताव्यापासून शेतकरी वंचित राहात होते. आता लागवडीपासून कापणीनंतरचे नुकसान ग्राह्य धरले जाणार असल्याने विमा योजनेकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. विमा योजनेसाठी मुदतवाढ देण्यात आल्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांची वाढ होऊ शकते. कृषी विभागाकडूनही शेतकऱ्यांना विमा योजनेसाठी प्रोत्साहन दिले जात आहे.
-----------------------------
हवामानातील बदलामुळे प्रतिकूल परिस्थिती उद्भवत असल्याने पेरणीपासून काढणीपर्यंत पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना हातभार मिळावा, यासाठी पंतप्रधान पीक विमा योजना जाहीर केली आहे. गेल्या दोन वर्षात पावसाळा लांबल्यामुळे भात कापणीवेळी शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विमा उतरवणे आवश्यक आहे. या मुदतवाढीचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.
- विनोद हेगडे, तालुका कृषी अधिकारी, रत्नागिरी
----------------------------
विमा योजनेचा लाभ घेतलेले शेतकरी
तालुका शेतकरी
मंडणगड ३५७
दापोली १७१
खेड १३७
गुहागर १३९
चिपळूण १३६
संगमेश्वर २५८
रत्नागिरी ५४४
लांजा ६९
राजापूर ६९