राजापूर : दिवसाढवळ्या वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी फिरणाऱ्या टोळक्याच्या मुसक्या आवळण्यात नाटे पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाचजणांना अटक केली असून, त्यांच्याजवळील गावठी बंदूक जप्त केली आहे. अटक केलेल्यांमध्ये अनिल मोंडे, मंगेश बाणे, शरद मिरगुले, अक्षय राऊत, कल्पेश मिशाळ (रा़. कोंभे, नाणार, दत्तवाडी, ता़. राजापूर) यांचा समावेश आहे.
याप्रकरणी नाटे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाटे पोलीस स्थानकाचे सहायक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील हे सहकाऱ्यांसह बुधवारी दुपारी गस्त घालत हाेते़. त्याचवेळी राजापूर-जैतापूर मार्गावरील चिरेखाण परिसरात अनिल मोंडे हे सहकाऱ्यांसह गाडीतून संशयास्पदरित्या फिरताना दिसले. त्यामुळे पोलिसांनी त्यांची चौकशी करत वाहनाची झडती घेतली़, त्यावेळी गाडीत सिंगल बॅरल गावठी बंदूक आढळली.
संबंधितांकडे बंदुकीचा कोणताही परवाना नसताना बंदूक जवळ बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी मोंडे यांच्यासह अन्य ४ जणांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमध्ये पाटील यांच्यासह नाटे पोलीस स्थानकाचे विवेक साळवी, प्रसाद शिवलकर यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.