असगोली : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशा परिस्थितीतही गेल्या दीड वर्षात कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या महसुली गावांचे पंचायत समितीच्या वतीने सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये गुहागर तालुक्यातील उमराठ, मास, अडुर, मुढर व कुटगिरी आदी ५ महसुली गावांचा समावेश आहे. या गावांत गेल्या दीड वर्षात एकही कोरोनाबाधित व्यक्ती सापडलेली नाही.
उमराठ ग्रामपंचायतीमधील उमराठ खुर्द (आंबेकरवाडी) या महसुली गावातील ग्रामस्थ व ग्रामपंचायत प्रशासनाने कोरोनामुक्तीसाठी काटेकोरपणे अंमलबजावणी केल्यामुळे हे यश मिळाले आहे. ग्रामस्थांच्या या कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
जिल्ह्यामध्ये गेले दीड वर्ष कोरोनाने थैमान घातले आहे. मागील दोन महिन्यांत तर वर्षभराच्या तुलनेत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. राज्य शासनाने सुरू केलेल्या अनलॉकमध्येही जिल्हा चौथ्या स्थानावर असताना, जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींनी कोरोनाला वेशीवर रोखण्यात यश मिळविले. त्यापैकी उमराठ ग्रामपंचायत आहे.
उमराठ खुर्द गावाला कोरोनामुक्तीसाठी ग्रामस्थांचे उत्तम समन्वय, एकत्रितपणे घेतलेले निर्णय, त्याला स्थानिकापासून मुंबईकरांकडून मिळालेला उत्तम प्रतिसाद कारणीभूत असल्याचे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी सांगितले. ही मोहीम राबविताना आंबेकरवाडीतील वठार कृती दल, वाडीकृती दल, ग्राम कृती दल याचे सदस्य, तसेच कोरोना योद्धा पोलीस पाटील वासंती आंबेकर, अंगणवाडीसेविका राधा रायकर, मदतनीस नीलम जोशी, आरोग्यसेविका रुचिता कदम, वाडी प्रमुख, पदाधिकारी आणि सर्व ग्रामस्थांचा मोलाचा सक्रिय सहभाग लाभला आहे. गेली ६२ वर्षे ही ग्रामपंचायत बिनविरोध निवडली जात आहे, यातच या गावातील एकीचे दर्शन घडत आहे.