मेहरून नाकाडे
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : लाॅकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेसाठी सुरू असलेली एस.टी.ची सेवा अनलाॅकमध्ये विस्तारित करण्यात आली. आंतरजिल्हा व ग्रामीण भागातील वाहतूक सुरू करण्यात आली आहे. सध्या ३१० गाड्यांद्वारे १४३३ फेऱ्या सुरू आहेत. खासगी वाहतूक अद्याप बंद असली तरी एस.टी.चे भारमान मात्र घटले आहे.
रत्नागिरी विभागाच्या एकूण ६०० गाड्यांपैकी ३१० गाड्या सुरू आहेत. ४२०० फेऱ्यांपैकी १४३३ फेऱ्या सुरू आहेत. कोरोनापूर्वी दोन लाख प्रवाशांची दैनंदिन वाहतूक सुरू होती. मात्र, सध्या ४९ हजार इतकीच प्रवासी वाहतूक होत आहे. प्रवासी क्षमतेच्या पन्नास टक्के वाहतुकीला परवानगी देण्यात आली असतानाही, प्रवाशांचा अल्प प्रतिसाद लाभत असल्याने एस.टी.च्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे.
शाळा, महाविद्यालये बंद असल्यामुळे शालेय फेऱ्या बंद आहेत. ग्रामीण भागात शेतीची कामे सुरू झाली असल्याने शेतकरी कामामध्ये व्यस्त आहेत. शिवाय कोरोनाची भीती अद्याप ग्रामीण भागात असल्याने प्रवासी घराबाहेर पडत नसल्याचे निदर्शनास येत आहे. मुंबई, पुणे मार्गावर मात्र प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. खासगी वाहतुकीसाठी परवानगी नसल्याने वाहतूक ठप्प असतानाही, एस.टी.चे भारमान मात्र वाढलेले नाही. त्यामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
n खंडाळा, जयगड, सैतवडे मार्गावर खासगी गाड्या मोठ्या प्रमाणावर असल्या तरी अद्याप बंद आहेत.
n लांजा, राजापूर, संगमेश्वर, चिपळूण मार्गावरील खासगी वाहतूकही बंदच आहे.
n कोल्हापूर मार्गावर खासगी वाहतूक करण्यात येते. मात्र, परवानगी नसल्याने वाहतूक बंद आहे.
n चिपळूण ते पोफळी, दापोली ते हर्णै व अन्य मार्गावरील खासगी वाहतूक बंद असल्याने एस.टी.कडे प्रवासी वळला आहे.
n लाॅकडाऊनमध्ये एस.टी.वाहतूक अत्यावश्यक सेवेंतर्गत सुरू होती.
n अनलाॅकनंतर आंतरजिल्हा, ग्रामीण, शहरी मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
n प्रवाशांचा प्रतिसाद अल्प लाभत असल्याने निम्म्यापेक्षा कमी फेऱ्या सुरू आहेत.
n बहुतांश गावातून एस.टी सेवा सुरू झाली असली तरी दिवसाला एखादीच फेरी धावत आहे.
n फेऱ्या कमी असल्याने २० टक्के कर्मचारी घरी आहेत.
खंडाळा, जयगड, सैतवडे अंतर रत्नागिरीपासून जास्त आहे. शिवाय या मार्गावरील बसफेऱ्याही मोजक्याच सुरू आहेत. सध्या खासगी वाहतूक बंद असल्याने प्रवाशांना जास्त वेळ ताटकळत थांबावे लागते. त्यामुळे या मार्गावरील बसफेऱ्यांमध्ये वाढ करावी, जेणेकरून प्रवाशांची होणारी गैरसोय दूर होण्यास मदत होईल.
- राहुल पवार, प्रवासी, खंडाळा.
कोल्हापूर, सांगली, सातारा येथे कामानिमित्त जाणाऱ्यांची संख्या अधिक असून एका दिवसात काही प्रवासी परत फिरतात. मात्र, मोजक्याच बसेस सुरू असल्याने वैद्यकीय किंवा व्यापारी कामासाठी गेलेल्यांना एका दिवसात परत फिरणे शक्य होत नाही. त्यामुळे नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
- संतोष वाडकर, व्यापारी, रत्नागिरी.