चिपळूण : शहरातील बहादूरशेख परिसरात असलेल्या एका बँकेच्या एटीएममधून आज (बुधवारी) सकाळी एका ठेकेदाराने १० हजार रुपयांची रोकड काढली असता त्यामध्ये ५०० रुपयांच्या बनावट नोटा आढळल्याने खळबळ उडाली आहे. बहादूरशेख येथे असलेल्या स्टेट बँक आॅफ हैद्राबाद या बँकेतून आज सकाळी ११.२३ वाजता योगेश चव्हाण या तरुण ठेकेदाराने आपल्या खात्यातून एटीएमच्या माध्यमातून १० हजार रुपये काढले असता त्यामध्ये ५००च्या काही नोटा खोट्या असल्याचे निदर्शनास आले. त्याने बँकेच्या व्यवस्थापनाशी याबाबत संपर्क साधला असता त्याला नोटा बदलून देणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर चव्हाण यांनी बँकेच्या समोर असलेल्या पोलीस चौकीत पोलिसांशी संपर्क साधला होता. परंतु, बँकेने या बनावट नोटा बदलून दिल्या. चिपळूण शहरातील बँकेत बनावट नोटा आढळल्याचे समजताच व फेसबुक, व्हॉट्सअपच्या माध्यमातून याबाबत एसएमएस येताच अनेकांचे धाबे दणाणले. याबाबत पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. (प्रतिनिधी)
चिपळुणात एटीएममध्ये ५०० च्या बनावट नोटा
By admin | Published: June 17, 2015 10:14 PM