खेड : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त करावयाच्या वृक्षलागवडीसाठी आणलेल्या रोपांमधील तब्बल ५०० रोपे खेड पंचायत समितीच्या आवारातच कुजून गेली आहेत.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी 'झाडे लावा, झाडे जगवा', ही मोहीम मतदार संघामध्ये राबवली. त्यासाठी अडीच हजार रोपांची लागवड करण्याचा
कार्यक्रम त्यांनी स्थानिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांच्या भरवशावर घेतला आहे. मात्र, शिवसेनेची सत्ता असलेल्या खेड पंचायत समिती कार्यालय परिसरात लागवडीसाठी आणलेली सुमारे पाचशे रोपे कुजून गेल्याचे विदारक चित्र दिसून आले.
सामाजिक वनीकरण विभागाने तब्बल दोन हजार रोपे खेड पंचायत समितीला उपलब्ध करून दिली होती. त्यातीलच ही रोपे असल्याचे समजते. मात्र, ही रोपे ग्रामपंचायतींना देण्याची किंवा ती सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी पंचायत समितीच्या कृषी विभागाने पूर्णपणे झटकल्याने हा प्रकार घडल्याचे म्हटले जाते. रोपे कुजल्याचा हा प्रकार पत्रकारांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर कुजलेली रोपे
बाजूला काढून चांगली रोपे व्यवस्थित लावण्याचे काम सुरू करण्यात आले; परंतु ही रोपे ग्रामपंचायतींनी पंचायत समितीतून का नेली नाहीत? ही झाडे व्यवस्थित न ठेवता ती कुजून गेली, तरी त्याकडे लक्ष का दिले नाही? असे अनेक प्रश्न हे मात्र यावेळी अनुत्तरितच
राहिले आहेत.
याबाबत खेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जाधव, तसेच कृषी विस्तार अधिकारी राणे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तालुक्यातील सर्व
ग्रामपंचायतींना मिळून २ हजार झाडे
वृक्षारोपणासाठी उपलब्ध झालेली असताना, एका जिल्हा परिषद सदस्याने स्वतःच्या मतदार संघासाठी १ हजार झाडे राखून ठेवल्याची चर्चा आहे. शासन स्तरावर 'झाडे लावा, झाडे जगवा' हा संदेश जनतेला दिला जात असतानाच खेड पंचायत समितीच्या
आवारात घडलेल्या या प्रकरणी जिल्हा
परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांनी चौकशी करावी व कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.