दापोली : तालुक्यातील आंजर्ले खाडीतील गाळ काढून बंधारा घालण्यात येणार आहे़ यासाठी शासनाकडून ५६ कोटी रुपये मंजूर झाले असल्याची माहिती आमदार योगेश कदम यांनी दिली .
आंजर्ले खाडीत वर्षानुवर्षे साठलेला गाळ काढण्याची मागणी मच्छीमार बांधवांकडून केली जात होती़; परंतु केवळ आश्वासनाशिवाय प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालीच नव्हती़ या मागणीला आता मूर्त स्वरूप प्राप्त झाले असून, आमदार योगेश कदम यांच्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे़ याबाबत आमदार योगेश कदम यांनी मागणी केली असून, त्यांच्यासमवेत हर्णै बंदर कमिटीचे चेअरमन बाळकृष्ण पावशे, महेंद्र चौगुले, प्रकाश रघुवीर यांच्यासमवेत आमदार याेगेश कदम यांनी आंजर्ले खाडीची पाहणी केली़
आंजर्ले खाडीमध्ये बोटी उभ्या केल्या जातात़; परंतु गेली अनेक वर्षे या खाडीमध्ये गाळ साठल्याने अनेक वेळा खाडीत बोटी भरकटून अपघातासारख्या गंभीर परिस्थिती मच्छिमार बांधवांना सामोरे जावे लागत होते़ याच ठिकाणी बोटी लावताना दक्षिणेकडच्या वाऱ्याचासुद्धा मोठ्या प्रमाणात त्रास मच्छिमारांना सहन करावा लागत आहे़ यापूर्वी आलेल्या वादळातून आपल्या बाेटी वाचवण्यासाठी मच्छीमार बांधव आंजर्ले पुलाजवळ आपल्या बोटी लावत असतात़; परंतु या बोटी समुद्रात नेताना किंवा किनाऱ्यावर लावताना अनेक वेळा बोटी गाळात रुतून बोटींचे मोठे नुकसान झाले आहे़, तसेच काही वेळा तर मच्छिमारांना आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे़, त्यामुळे समुद्रखाडीच्या मुखाशी असलेला गाळ काढणे गरजेचे होते़ हा गाळ काढण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला असून, पावसाळ्यानंतर लगेच या कामाला सुरुवात होणार आहे़
आंजर्ले जुईकर मोहल्ला या ठिकाणच्या वस्तीला धोका निर्माण होऊ नये, यासाठी बंधारा बांधण्यात येणार आहे. सुमारे एक किलोमीटरपर्यंतचा खाडीतील गाळ काढण्यात येणार असून, तीनशे मीटरपर्यंत दोन्ही बाजूने बंधारा बांधण्यात येणार आहे़ दोन्ही गावांना या बंधाऱ्यांचा फायदा होणार आहे़
----------------------------
दापाेली तालुक्यातील आंजर्ले खाडीतील प्रस्तावित बंधाऱ्याची आमदार योगेश कदम यांनी पाहणी केली़