रत्नागिरी : जिल्ह्यात पाणीटंचाईची वाढती दाहकता लक्षात घेऊन सरपंचांच्या मागणीनुसार पालकमंत्र्यांनी ५८ विंधन विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली.
जिल्ह्यात प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडूनही एप्रिल, मे महिन्यात पाणीटंचाई सुरू होते. ही पाणीटंचाई दूर करण्यासाठी आणि तेथील रहिवाशांना प्रत्येक व्यक्तीमागे ४० लिटर पाणी मिळावे, या हेतूने जिल्ह्यात ५८ बाेअरवेल मंजूर करण्यात आल्या आहेत. या विंधन विहिरी हव्यात म्हणून सरपंच, पंचायत समिती सदस्या आणि जिल्हा परिषद सदस्य यांनी वारंवार मागणी लावून धरली होती. त्याला यश आले आहे.
जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्याला यामध्ये प्राधान्य देण्यात आले आहे. त्यासाठी विंधन विहिरींचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी यंत्रामार्फत पाणी तापविले जाईल त्या ठिकाणी पाऊस सुरू होण्यापूर्वी या विहिरींचे खोदकाम केले जाणार आहे. शासनस्तरावरून या कामाला मंजुरी मिळाल्याने अनेक ठिकाणी होणारी पाणीटंचाई कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.