रत्नागिरी : गेल्या महिन्यापासून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत अधिकाधिक भर पडू लागली आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात नव्या ५९६ रुग्णांची भर पडली आहे. तर एकाच दिवसात ७ आणि मागील दहा अशा एकूण १७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. बरे झालेल्या ५२१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून तब्बल ५९२ जणांचे अहवाल अबाधित आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या २४,२२२ इतकी झाली आहे. मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये आरटीपीसीआर चाचणीत २७७ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले असून ॲंटिजेन चाचणीत ३१९ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. सर्वाधिक रुग्णसंख्या तब्बल २४६ चिपळूण तालुक्यात आहे. त्याखालोखाल रत्नागिरीत ८४, दापोली ४५, खेड ६८, गुहागर ४८, संगमेश्वर ३८, मंडणगड १६, लांजा २६ आणि राजापूर तालुक्यात २५ रुग्णांची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात ३० एप्रिल ते ४ मे या कालावधीत १७ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाने घेतलेल्या बळींची संख्या ७१५ इतकी झाली आहे. मंगळवारी नोंदविलेल्या या १७ मृत्यूंमध्ये दापोली आणि रत्नागिरीमध्ये प्रत्येकी ५, संगमेश्वरमध्ये ७ आणि राजापूर तालुक्यातील २ जणांचा समावेश आहे. मृत्यूची टक्केवारी २.९५ इतकी आहे.
जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून बरे झालेल्या ५२१ जणांना मंगळवारी घरी सोडण्यात आले. आतापर्यंत १६ हजार ९१२ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. बरे होणाऱ्यांची टक्केवारी आता ६९.८२ इतकी झाली आहे. तसेच एका दिवसात केलेल्या चाचणीत ५९२ जणांचे अहवाल अबाधित आले आहेत. सध्या विविध ठिकाणी ६५९५ रुग्ण उपचार घेत आहेत.