रत्नागिरी : शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघातात वाढ होत चालली आहे. रविवारी मारुती मंदिर येथे खड्डयात आदळून दुचाकी घसरल्याने झालेल्या अपघातात ६ महिन्यांचे बाळ सुदैवाने बचावले आहे.
शहरातील मुख्य रस्त्यासह आजूबाजूच्या परिसरातील सर्वच रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुर्दशा झाली आहे. या रस्त्यांवर पडलेले खड्डे चुकवताना झालेल्या अपघातांमध्ये अनेक जखमी झाल्याच्या घटना घडत आहेत. रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मारुती मंदिरजवळील रस्त्यावर खड्ड्यामध्ये आदळून दुचाकी घसरून अपघात झाला. या दुचाकीवरून मिरकरवाड्यातील एक जोडपे आपल्या ६ महिन्यांच्या बाळाला घेऊन चालले होते. खड्डा वाचविण्याच्या नादात दुचाकीला अपघात झाल्याने गाडीवर पाठीमागे बसलेली महिला आपल्या बाळासह रस्त्यावर फेकली गेली.
अपघात झाल्याचे लक्षात येताच अनेक जण धावून आले. त्याचवेळी त्या दुचाकीच्या पाठीमागून आपल्या गाडीतून चाललेले जेआर फाऊंडेशनचे अध्यक्ष कॅप्टन जावेद पटेल हे गाडीतून अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले. त्यांनी इतर लोकांच्या मदतीने त्या अपघातग्रस्त जोडप्याला बाळासह आपल्या चारचाकी गाडीतून खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. त्या जोडप्याकडून कॅप्टन पटेल यांनी नातेवाईकांची माहिती घेऊन मोबाईलवरून संपर्क साधला. काही वेळातच नातेवाईक रुग्णालयात हजर झाले. डॉक्टरांनी त्या जोडप्यासह बाळाची तपासणी केली असता बाळ सुखरुप होते. मात्र, त्या बाळाचे आई-वडील असलेले जोडपे जखमी झाले होते. त्या अपघातग्रस्तांना सहाय्य केल्याबद्दल त्यांच्या नातेवाईकांनी कॅप्टन पटेल यांचे आभार मानले.