रत्नागिरी : ‘आपली मांडवी, स्वच्छ मांडवी’ या सोशल मीडियावर केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मांडवीतील स्थानिक व्यापारी, उद्योजक, रत्नागिरीकरांनी एकत्र येत रविवारी मांडवी समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी ६०० किलो कचरा संकलित करण्यात आला आहे. प्लास्टिक कचरा वेगळा केला असून विघटनासाठी पाठविण्यात आला आहे.
उन्हाळी सुट्टीमुळे शहरात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. मांडवी समुद्रकिनारी स्थानिकांबरोबरच पर्यटकांची वर्दळ वाढत आहे. संध्याकाळी किनाऱ्यावर फेरफटका मारणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. पर्यटक, फिरायला येणाऱ्या नागरिकांकडून किनाऱ्यावर कचरा टाकण्याचा प्रकार वाढला आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या खाऊचे रॅपर्स, शेंगांची टरफले, कणसे हा कचरा किनाऱ्यावर पसरलेला असतो. त्यामुळे सोशल मीडियावर ‘आपली मांडवी, स्वच्छ मांडवीसाठी आवाहन करण्यात आले होते. या आवाहनासाठी रत्नगिरीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.