रत्नागिरी : कलाप्रेमी व कलाकार यांना नेहमीच मानाची वागणूक द्या, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. रत्नागिरीतील थिबा पॅलेस येथे राज्याच्या कला संचालनालयातर्फे आयोजित ६१ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी आमदार शेखर निकम, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रा, सर जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचे प्रा. विश्वनाथ साबळे, माजी आमदार सदानंद चव्हाण, सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट्स सावर्डेचे प्राचार्य प्रकाश राजेशिर्के, युगंधरा राजेशिर्के उपस्थित होते.उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते कला प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सामंत म्हणाले की, प्रकाश राजेशिर्के हे कोकणाचे भूषण आहेत. त्यांची कला नेहमीच सर्वांना भुरळ पाडणारी ठरली आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये कला प्रदर्शनाचे आयोजन करणे आवश्यक आहे, जेणेकरून सर्व जिल्ह्यातील कलाप्रेमींना आपली कला सादर करण्याची संधी मिळेल. तसेच अशा प्रकारची प्रदर्शने दर सहा महिन्यांनी आयोजित करावी, असा मानस त्यांनी व्यक्त केला.जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील म्हणाले की, कलाकाराच्या नजरेतील आणि मनातील भावना कलेद्वारे प्रकट होत असतात. कलेचे शिक्षण घेणारा विद्यार्थी आपल्या मनातील भावना चित्रकलेच्या शैलीतून व्यक्त करीत असतो, असे सांगितले.
२१ ते २६ मार्च या कालावधीत या कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये १८ कलाकार आपली कला सादर करणार आहेत. कार्यक्रमात कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रा यांनी कार्यक्रमाचा अहवाल सादर केला. प्राचार्य प्रकाश राजेशिर्के यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थी विभागाच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
प्रकाश राजेशिर्के यांचा गाैरवसह्याद्री स्कूल ऑफ आर्ट्स सावर्डेचे प्राचार्य प्रकाश राजेशिर्के व त्यांच्या पत्नी युगंधरा राजेशिर्के यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. ५० हजार रुपये, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ तसेच राजेशिर्के यांना चांदीचा करंडा देऊन सन्मानित करण्यात आले.