चिपळूण : अनलॉकच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक शाळांची स्थिती अत्यंत दयनीय आहे. तालुक्यातील ४७ शाळांच्या ६३ वर्गखोल्या नादुरुस्त असून, १८ वर्गखोल्या या धोकादायक आहेत. त्यामुळे जवळपास ७००हून अधिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य संकटात सापडले आहे. ही चिंतेची बाब असून, जिल्हा परिषद प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्य राकेश शिंदे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळा या ग्रामीण दुर्गम भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीत महत्त्वाच्या आहेत. इंग्रजी माध्यमांच्या सर्व सुविधांनी युक्त शाळांमुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या आधीच कमी होत आहे. त्यामुळे पटसंख्या टिकवून शाळा टिकविण्याचे आव्हान जिल्हा परिषदेसमोर आहे. यातही विशेष म्हणजे तालुक्यातील पटसंख्येअभावी बंद पडलेल्या १९ शाळांच्या ४४पैकी ४० वर्गखोल्या सुस्थितीत आहेत. यातील काही स्थानिक पातळीवर वापरात आहेत. मात्र, पटसंख्या असलेल्या शाळांच्या वर्गखोल्या दुरुस्तीसाठी आ वासून उभ्या आहेत.
गोवळकोट, नायशी क्रमांक १, कुटरे, निवळी या शाळा तर उर्वरित शाळांच्या वर्गखोल्या नादुरुस्त आहेत. ताैक्ते वादळाने तालुक्यातील २२ शाळांच्या ३१ वर्गखोल्यांचे नुकसान झाले आहे. त्यांच्या दुरुस्तीसाठी १० लाख २३ हजार रुपये निधी आवश्यक आहे. पावसाळा सुरू होऊन २० दिवसांचा कालावधी झाला आहे. सुदैवाने वेगवान वारे आणि अतिवृष्टीचा धोका टळला आहे. अन्यथा नुकसानात आणखी भर पडली असती. अशा परिस्थितीत संभाव्य दुर्घटना आणि नुकसान टाळण्यासाठी या धोकादायक नादुरुस्त शाळांच्या विषयात जिल्हा परिषद प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे आणि तातडीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.