रत्नागिरी : गेली दीड वर्षे ठाण मांडून बसलेल्या कोरोनाने आता उच्चांकच गाठला आहे. दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या कमालीची वाढली आहे. केवळ शहरीच नाही तर ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. मात्र, असे असतानाही रत्नागिरी जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतींपैकी ६५ ग्रामपंचायतींनी कोरोनाला अजूनही वेशीवरच रोखले आहे.
गतवर्षी मार्चमध्ये जिल्ह्यात कोरोनाने प्रवेश केला. कोरोना रोखण्यासाठी जिल्हाभरात प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर ग्राम कमिटीच्या माध्यमातून जनजागृती व विविध उपाययोजना करण्यात आल्या. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, सध्याचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण आरोग्य यंत्रणा, महसूल, पोलिसांसह विविध विभागांतर्फेे प्रत्येक पातळीवर कोरोना रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
कधी गणेशोत्सवानंतर तर कधी शिमग्यानंतर रुग्णांची संख्या वेगाने वाढत गेली. शहरी, ग्रामीण कुठलाही भाग त्याला अपवाद राहिला नाही. मात्र, सर्वत्र इतकी गंभीर परिस्थिती असतानाही जिल्ह्यात अजूनही काही गावे कोरोनापासून अबाधित राहिली आहेत. खेड तालुक्यातील कर्जी हे गाव सर्वाधिक लोकसंख्या असणारे आहे, तरीही कोरोनामुक्त असल्याने ग्रामपंचायतीचे विशेष कौतुक करण्यात येत आहे. शासनाने कोरोनामुक्त ठरणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी पारितोषिक जाहीर केले आहे. जिल्ह्यातील कर्जी (खेड), पोफळवणे (दापोली), बोरगाव (चिपळूण) शासनाच्या पारितोषिकाच्या स्पर्धेत आहेत.
...................
ग्रामपंचायती कोरोनामुक्त ठेवण्यात ग्रामस्थांसह ग्रामकमिटी, सरपंच, आरोग्य कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविका यांचे मोठे योगदान आहे. ग्रामस्थांनी पाळलेल्या निर्बंधांमुळेच ६५ ग्रामपंचायती आतापर्यंत कोरोनामुक्त राहिल्या आहेत.
- अरुण मरभळ, प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी.
.............................
जिल्ह्यातील कोरोनामुक्त ग्रामपंचायती
मंडणगड तालुका- दाभट, कुडूप खु., मुरादपूर, पिंपळाली, पडवे, तोंडली, वाल्मीकीनगर.
दापोली तालुका- आडे, गवे, मुगीज, शिरफळ, डौली, आपटी, शिरवणे, करंजाळी, विरसई, साकुर्डे, पोफळवणे, करंजगाव, बावळी बु., देहेण, सुकोंडी, नवसे, कवडोली, भोपण.
खेड तालुका- कर्जी, सवणस, तुंबाड, चौगुले मोहल्ला, जैतापूर, तुळशी खु. व बु. आणि भेलसई.
चिपळूण तालुका- बोरगाव, खोपड, तळवणे, दावणगाव
गुहागर तालुका- अडूर, मासू, उमराठ, मुंडर, कुटगिरी
संगमेश्वर तालुका- पाचांबे, डावखोल, देवळे, घाटीवळे, ओझर खु., बेलारी बु., देवडे, साखरपा, घोळवली.
रत्नागिरी तालुका- चरवेली, वळके, मेर्वी
लांजा तालुका- वेरवली खु., पुनस, वडगाव हसोळ
राजापूर तालुका- आडवली, हरळ, डोंगर, विले, शेडे, राजवाडी