लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : शिक्षकांना शिक्षक दिनापर्यंत लसीकरण पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र अजूनही जिल्ह्यातील ६७६ शिक्षकांचे लसीकरण पूर्ण होणे शिल्लक आहे. ९ सप्टेंबरपासून शाळांना गणेशोत्सवाची सुट्टी आहे. या सुट्टीमुळे शिक्षकांना दिलासा मिळाला असून, सुट्टीत लसीकरण शंभर टक्के पूर्ण होण्याची शक्यता आहे.
लाॅकडाऊन काळात शिक्षकांना कोरोना ड्युटी लावण्यात आल्या होत्या. त्या काळात काही शिक्षक कोरोना संक्रमित झाले होते. कोरोना बरा झाला तरी तीन महिन्यांनंतर लस घेता येते. त्यामुळे काही शिक्षकांचे लसीकरण राहिले होते. शिवाय मधल्या काळात लसीकरण संथगतीने सुरू असल्याचाही फटका बसला आहे. परंतु आठवडाभरात बहुतांश लसीकरण पूर्ण होण्याची शक्यता आहे.
लसीकरणाची सूचना
बहुतांश शिक्षकांनी लसीकरण पूर्ण केले असून उर्वरित शिक्षकांचे लसीकरण अद्याप सुरू आहे. कोरोनाबाधित शिक्षकांना मात्र वैद्यकीयदृष्ट्या काही दिवसांनंतर लसीकरण करावे लागणार आहे. गणेशोत्सवाच्या सुट्टीत शिक्षकांचे लसीकरण पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली आहे.
- निशादेवी वाघमोडे, शिक्षणाधिकारी
सुट्टीमुळे दिलासा
ऑनलाइन अध्यापन सुरू असले तरी गणेशोत्सवासाठी ९ ते १५ सप्टेंबरपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. प्रत्यक्ष शाळा सुरू होण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे गणेशोत्सवाची सुट्टी शिक्षकांसाठी दिलासादायक ठरली आहे. शासनाकडून लसीचा पुरवठाही मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने आठवडाभरात शिक्षकांचे लसीकरण पूर्ण होईल.