रत्नागिरी : वीज मीटरच्या तुटवड्यामुळे नवीन वीज जोडणीवर परिणाम होत आहे. कोकण परिमंडलातर्फे पाठपुरावा करण्यात आल्याने मार्चअखेरपर्यंत कोकण प्रादेशिक कार्यालयाकरिता ६९ हजार ७०० मीटर उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
महावितरणकडून दरवर्षी राज्यात आठ ते नऊ लाख नवीन वीजजोडण्या देण्यात येतात. गतवर्षी मार्चमध्ये लॉकडाऊनमुळे नवीन वीज मीटरची उपलब्धता काही प्रमाणात कमी झाली होती. त्यामुळे वीज मीटरचा तुटवडा निर्माण झाला होता. जिल्ह्याला १५ हजार मीटरची आवश्यकता आहे. त्यात तीन हजार नवीन जोडण्या असून, उर्वरित नादुरुस्त मीटरसाठी पर्यायी मीटर उपलब्ध करून दिले जाणार आहेत. मात्र वीज मीटरच उपलब्ध नसल्याने वीज जोडण्या रखडल्या आहेत. ज्या ग्राहकांना तातडीने वीज जोडणी हवी आहे, त्यांना १२०० रुपये खर्च करावे लागत आहेत.
मीटरअभावी ग्राहकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी उपलब्ध मीटर तातडीने ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना मुख्य कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत. मीटरची कमतरता जाणवू नये, यासाठी महावितरणकडून उपाययोजना करण्यात आली आहे. सध्या महावितरणतर्फे पर्यायी मीटर उपलब्ध करून देण्यात आले असून, ग्राहकांनी खुल्या बाजारातून मीटर खरेदी करण्याची आवश्यकता नाही, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.