रत्नागिरी : जिल्ह्यात गुरूवार (३ जून)पासून कडक लाॅकडाऊनची अमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. लाॅकडाऊनच्या पहिल्याच दिवशी रत्नागिरी शहरात विनाकारण फिरणाऱ्या ९ जणांच्या गाड्या जप्त केल्या आहेत तर सातजणांची काेराेना चाचणी करण्यात आली असून, त्यामध्ये एकजण पाॅझिटिव्ह आढळला आहे.
काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लाॅकडाऊनच्या काळात केवळ अत्यावश्यक सेवेला मुभा देण्यात आली आहे. प्रशासनाने कोणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. तरीही काही नागरिक अनावश्यक घराबाहेर पडत हाेते. हे सर्व नागरिक नाकाबंदी असलेल्या ठिकाणी पोलिसांच्या तावडीत सापडले. पाेलिसांनी विनाकारण बाहेर पडलेल्या ७ जणांची पोलीस दलामार्फत कोरोना चाचणी केली़. या चाचणीत एकजण पाॅझिटिव्ह सापडला आहे. लॉकडाऊनच्या काळात ही कारवाई सुरू राहणार असल्याचे शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड यांनी सांगितले.
वाहतूक पोलिसांनीही अनावश्यक फिरणाऱ्या ९ वाहनधारकांवर कारवाई करत त्यांच्या गाड्या जप्त केल्या आहेत. या गाड्या लॉकडाऊन संपल्यानंतरच मालकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. ही कारवाई वाहतूक पोलीस निरीक्षक शिरीष सासने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.