रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील ७ जणांचे शस्त्र परवाने रद्द करण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत. यातील ६ शस्त्र आत्मसंरक्षणासाठी असून, एक शेती संरक्षणासाठी घेण्यात आली आहेत. शस्त्र परवाना रद्द केलेल्यांमध्ये शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांचाही समावेश आहे. आतापर्यंत आठजणांचे शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत.
परवाने रद्द केलेल्यांमध्ये संगमेश्वरातील पाच जणांचा, तर रत्नागिरी तालुक्यातील दोघांचा समावेश आहे. परवाना रद्द झालेल्यांमध्ये अनंत भागोजी भाताडे (रा. बुरंबी, संगमेश्वर), महेंद्र उर्फ राजन नारायण कापडी (रा. कडवई, संगमेश्वर), राजेंद्र विष्णू महाडिक (रा. कसबा, संगमेश्वर), सुनील श्रीकांत सुर्वे (रा. नावडी, संगमेश्वर), चंद्रकांत अमृता जाधव (रा. कुळेवाशी, संगमेश्वर), प्रकाश शंकर साळवी (रा. गोळप, रत्नागिरी), सुधीर भिवा आंब्रे (रा. पूर्णगड, रत्नागिरी) यांचा समावेश आहे. या सर्वांना आपली शस्त्र जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
परवाने रद्द झालेल्यांमध्ये शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख व सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हा परिषदेचे माजी सभापती महेंद्र उर्फ राजन कापडी यांचाही समावेश आहे. अजूनही काहीजणांचे शस्त्र परवाने रद्द करण्याचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.