रत्नागिरी
: संगमेश्वर तालुक्यातील माखजन येथील कबूतर मोहल्ला ते बाजारपेठ भर रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून
अल्पवयीन मुलीच्या डोक्यात बिअरची बाटली मारून जखमी करण्यात आले हाेते. तसेच चाकूने तिच्यावर वार करत
ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला न्यायालयाने गुरुवारी ७ वर्षे
सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. यामध्ये त्या तरुणाने
त्याच चाकून स्वतःवर वार करून घेतले होते. ही घटना ३ वर्षांपूर्वी घडली
होती.
रोशन
भीमदास कदम (रा. माखजन बौध्दवाडी, ता. संगमेश्वर) असे शिक्षा
सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीने संगमेश्वर पोलीस
स्थानकात तक्रार दिली होती. रोशन हा मुंबईहून गावी आला होता. त्याची पीडित
मुलीशी मैत्री झाली. त्यानंतर तो तिच्याशी वारंवार फोनवर बोलून मेसेज
करायचा. त्यावरून मुलीच्या वडिलांनी रोशनला पुन्हा फोन करू नकोस, असे
सांगितले होते. दरम्यान, ८ जानेवारी २०१८ रोजी सकाळी १०.१५ वाजण्याच्यासुमारास पीडित मुलगी तिच्या मैत्रिणीसह कॉलेजला जात होती. तेव्हा रोशनने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु, ती न थांबता पुढे जायला लागली. त्यावेळी तिचे
आपल्यावर प्रेम नाही तसेच ती आपल्याशी बोलत नाही, या रागातून रोशनने तिच्या
पाठीमागून जाऊन भररस्त्यात तिच्या डोक्यात बिअरची रिकामी बाटली मारली. त्यानंतर
कटर कम् चाकूने तिच्या मानेवर आणि गळ्यावर वार करून तिला
ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याच चाकूने स्वतःवर वार करून स्वतःचा
जीव घेण्याचाही प्रयत्न केला होता.
याप्रकरणी
संगमेश्वर पोलिसांनी रोशनवर गुन्हा दाखल करून
न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. याप्रकरणी सरकारी पक्षातर्फे अॅड. विनय गांधी यांनी १२ साक्षीदार तपासले. सरकारी पक्षाचा पुरावा सबळ आहे हे ग्राह्य मानून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी रोशनला ७ वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंड, तो न भरल्यास ६ महिने
सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. या खटल्यात तपासिक अंमलदार म्हणून एम. एम. पाटील
यांनी काम पाहिले.