लोकमत न्यूज नेटवर्क
खेड : तालुक्यात कोरोनाने दुसऱ्या टप्प्यात हाहाकार उडवला असून, अवघ्या ६१ दिवसांत ७२ लोकांचा बळी कोरोनाने घेतला आहे. गतवर्षी एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत ६९ जणांचा मृत्यू झाला होता. मात्र यावर्षी केवळ मे या एका महिन्यात ३९ लोकांचा मृत्यू झाला, तर एप्रिलमध्ये ३३ जणांचा मृत्यू झाला. आता तरी नागरिकांनी स्वतःची व कुटुंबाची काळजी घेण्यासाठी, कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी याकडे गंभीरपणे पाहणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात खेड येथेच कोरोनाने पहिला बळी घेतला. खेड तालुक्यात एप्रिल २०२० मध्ये एकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आला होता. मात्र, त्यानंतर जुलै २०२० पर्यंत खेड तालुक्यातील एकूण कोरोनाबधितांची संख्या वाढत गेली. मात्र मृत्युदर नियंत्रणात होता. जुलैपर्यंत ९ जणांनी कोरोना साथीत जीव गमावला होता. ऑगस्टमध्ये साथ पसरण्याचा वेग वाढला आणि सप्टेंबरपर्यंत दोन महिन्यांत ५२ जणांचा कोरोनाने बळी घेतला. त्यानंतर कोरोना साथ नियंत्रणात येत गेली. ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांत केवळ नऊ जणांना कोरोनामुळे प्राण गमवावा लागला.
तालुका कोरानामुक्त होणार असे जानेवारीत वाटत असतानाच फेब्रुवारीपासून प्रत्येक महिन्यात १०० पेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळू लागले आणि पुन्हा एकदा धोक्याची घंटा वाजू लागली.
सुरुवातीला लॉकडाऊन नको म्हणणाऱ्या नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी नंतर मात्र काही प्रमाणात प्राप्त परिस्थिती सोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने एप्रिलमध्ये उच्चांक गाठला. या एका महिन्यात खेड तालुक्यातील ११९६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यात ३३ जणांना आपला प्राण गमवावा लागला. मेमध्येही तालुक्यात कोरोनाचे मृत्युतांडव सुरूच असून, तीस दिवसांत ३७ जणांचा त्याने बळी घेतला आहे. तालुक्यात मे महिन्यामध्ये सलग दुसऱ्या महिन्यात १ हजाराहून अधिक रुग्ण आढळले.
खेड तालुक्यातील ६५ ठिकाणी ॲक्टिव्ह कंटेन्मेंट झोन असून, २४१ कोरोनाबाधित रुग्णांवर अजून उपचार सुरू आहेत. तालुक्यात आतापर्यंत एकूण ३ हजार ९८० रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी २ हजारांपेक्षा जास्त रुग्ण लॉकडाऊन असताना गेल्या दोन महिन्यांत आढळून आले आहेत. रुग्णसंख्या इतकी वाढत असतानाही स्थानिक पोलीस, प्रशासन, लोकप्रतिनिधी व लोक मात्र त्याबाबत फारसे गंभीर नसल्याचे दिसत आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत तर खेडमध्ये अक्षरशः ‘कोरोना साखळी तोडो’ऐवजी ‘कोरोना साखळी जोडो’ अशी मोहीम असल्याचा भास होईल, असे भीतिदायक चित्र असते. शहरातील मुख्य बाजारपेठ पाहता अत्यावश्यकसोबत सलून, लेडिज ब्यूटिपार्लर, अनावश्यक व चैनीच्या वस्तूंची दुकानेही शटर खाली ठेवून बिनदिक्कत सुरू असतात.
स्थानिक नगरपालिका प्रशासन, पोलीस व शासकीय यंत्रणा हा सगळा प्रकार धोकादायक असल्याचे कळूनही उघड्या डोळ्यांनी केवळ पाहत आहे. त्यामुळेच खेडमध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत अधिक जणांचा बळी गेला आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर यापुढेदेखील अनेकांचे जीव जातील, अशी भीती व्यक्त होत आहे.
----------------------
महिना मृत्यू पॉझिटिव्ह
एप्रिल 33 1196
मे 39 1132
------------------------