रत्नागिरी : ऑक्सिजनची निकड केवळ कोरोना रुग्णांसाठीच भासते असे नाही तर इतर गंभीर रुग्णांनाही त्याची गरज असते. त्यादृष्टीने रत्नागिरीत ७२ लाखांचा खर्च असलेला ऑक्सिजन प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.सिंधुदुर्गात हा प्रकल्प सुरू झाला आहे. त्याची गरज लक्षात घेऊन हा प्रकल्प रत्नागिरीतही सुरू करण्यात येणार आहे. याबाबत पालकमंत्री अॅड. अनिल परब यांच्याशी चर्चा झाल्याचे सामंत यांनी सांगितले. हा प्रकल्प झाल्यानंतर ऑक्सिजनचा पुरवठा रत्नागिरीतून करणे शक्य होणार आहे. या प्रकल्पातून ऑक्सिजनच्या एका वेळी २८ बाटल्या तयार होणार असल्याची माहितीही यावेळी सामंत यांनी दिली.त्याचप्रमाणे रत्नागिरीत खासगी रुग्णालयात प्लाझ्मा थेरपी सेंटर सुरू झाली आहेत. मात्र, जिल्हा रुग्णालयात हे सेंटर सुरू होणे गरजेचे होते. त्यामुळे यासाठीही प्रयत्न सुरू होते. त्यासाठी आता सरकारकडून योग्य ती मशिनरी प्राप्त झाली असून, हे सेंटरही येत्या आठ दिवसात सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी आजच ऑनलाईन परवानगी घेण्यात आली आहे. रत्नागिरीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातही असे सेंटर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री सामंत यांनी दिली.रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या घटते आहे. मात्र, रत्नागिरी आणि चिपळूण तालुक्यांमध्ये ही संख्या अधिक आहे, त्याचे कारण म्हणजे मास्कचा वापर काही व्यक्ती करत नाहीत. त्यामुळे मास्क न वापरणाऱ्यांवर महसूल विभागाबरोबरच आता पोलीस विभागाकडूनही कडक कारवाई करण्याची मोहीम सुरू झाली असल्याचे सामंत यांनी सांगितले. रुग्णसंख्या घटत असली तरी मृत्यूदर वाढत आहे. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण कमी होण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.आयुष केंद्र सिंधुदुर्गात असल्यास परवानगीसध्या आयुष केंद्र दुसरीकडे हलविण्यावरून चर्चा सुरू आहे. याबाबत सामंत म्हणाले की, मंजूर असलेला प्रकल्प दुसरीकडे नेणे योग्य नाही. याबाबत आपण आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्याशी बोललो असता त्यांनी हे केंद्र सिंधुदुर्गात होणार असेल तरच आपण परवानगी देऊ, अन्यथा नाही, असे स्पष्ट केल्याचे सामंत यांनी सांगितले.
हाथरसप्रकरणी शिवसेनेची भूमिका संजय राऊत यांनी ठामपणे मांडली आहे. मात्र, या घटनेत मीडियाला धन्यवाद द्यायला हवेत. २२ दिवस तिथे काय चालले आहे, हे मीडियाने निर्भिडपणे दाखविले. त्यामुळे भाजपचे खरे रूप समोर आले आहे.- उदय सामंत