रहीम दलाल।लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : जिल्ह्यातील ७५ पाणीपुरवठा योजना लवकरच सौरऊर्जेवर चालविण्यात येणार आहेत. हे सौर पॅनल उभारण्यासाठी मेढा संस्थेने सुमारे पाच कोटी रुपये खर्च करण्यास मंजुरी दिली आहे. त्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव मागविले आहेत.ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग व जीवन प्राधिकरण यांच्यामार्फत पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांश गावे, वाड्यांचा पाणीप्रश्न मार्गी लागला आहे. मात्र, दुसरीकडे नळपाणी योजनांच्या वीजबिलांवर भरमसाठ खर्च होतो. पाणीपुरवठा योजनांसाठी ३ हॉर्सपॉवर ते १० हॉर्सपॉवरच्या विद्युत पंपाचा वापर करण्यात येतो. त्यामुळे हजारो रुपयांचे वीजबिल येते. हा खर्च ग्रामपंचायतीच्या आवाक्याबाहेरचा असल्यामुळे ते अनेकवेळा प्रलंबित राहते आणि त्यामुळे ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा खंडित केला जातो. यापूर्वी असे अनेक प्रकार घडले असून, त्यामुळे पाणीसाठा असतानाही केवळ वीज खंडित केल्याने ग्रामीण भागातील पाणीपुरवठा ठप्प होतो.जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने पाणीपुरवठा योजनांचे वीजपंप सौरऊर्जेवर चालवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मेढा संस्थेशी संपर्क साधून जिल्ह्यातील ७५ पाणीपुरवठा योजना वीजेऐवजी सौरऊर्जेवर चालविण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्यासाठी होणारा सुमारे ५ कोटी रुपये खर्च करण्यास ‘मेढा’ने मंजुरी दिली आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत जिल्ह्यातील ७५ पाणीपुरवठा योजना सौरऊर्जेवर चालणार आहेत. सौरऊर्जेमुळे या पाणीपुरवठा योजनांवर वीजेसाठी होणारा सुमारे ५० लाख रुपये एवढा खर्च वाचणार आहे.
७५ पाणीपुरवठा योजना आता सौरऊर्जेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 12:09 AM