- ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ उपक्रमाचा प्रभावी परिणाम
लोकमत न्यूज नेटवर्क
मंडणगड : ग्रामीण जीवनशैली, औद्योगिाीकरणापासून दूर, निसर्गाशी एकरूप असल्याने आणि लाॅगडाऊनचे कडक निर्बंध अवलंबल्यामुळे एका वर्षात मंडणगड तालुक्यातील १०९ गावांपैकी तब्बल ७९ गावांमध्ये काेराेनाचा शिरकाव झालेला नाही. तालुकावासीयांनी केलेला त्यागही या संक्रमणाला तालुक्यापासून दूर ठेवण्यास यशस्वी झाला आहे.
मुंबई, पुणे यासारख्या शहरांपासून काही तासांच्या अंतरावर असलेल्या तालुक्यातील लोक उदरनिर्वाहासाठी शहरांमध्ये गेलेली आहेत. त्यामुळे सण, उत्सव वगळता एरवी रिकाम्या असणाऱ्या गावात काेराेना काळात अनेक जण दाखल झाले. त्यामुळे तालुक्यात नेहमीपेक्षा दुप्पट लोक वास्तव्यास होते. मात्र, शासनाच्या नियमांचे पालन आणि स्वत: घेतलेली जबाबदारी यामुळे स्वत:च्या गावात गावाबाहेर १५ दिवस तंबूत आणि शाळेत काढल्यामुळेच गाव कोरोनामुक्त राहिले आहे. यावेळेत गावकऱ्यांनीही चांगले सहकार्य करीत आलेल्या चाकरमान्यांना सर्वतोपरी मदत करून घराबाहेर पडू नये म्हणून सहकार्य केले होते.
गावप्रमुख, वाडीप्रमुख आणी संपूर्ण मुंबई आणि गावातील मंडळांनी याबाबत स्वत: जबाबदारी स्वीकारत अनेक गोष्टींचा त्याग केला आहे. त्यामुळे गत वर्षभरात तालुक्यात केवळ १५३ रुग्ण सापडले असून, यातील केवळ ४ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर पूर्णपणे बरे होण्याचे प्रमाण हे ९० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. गतवर्षी काेरोनाला तालुक्यापासून दूर ठेवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचा मोठा वाटा आहे. कडक लाॅकडाऊन शासनाच्या नियमांचे पालन आणि नागरिकांची दक्षता यामुळे तालुक्यातील निम्म्याहून अधिक गावात कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. तालुक्यातील १०९ गावांपैकी केवळ ३० गावांमध्येच काेराेनाचा शिरकाव झाला आहे, तर ७० टक्के गावे आजही काेराेनापासून दूर राहिली आहेत. तालुक्यात वयोवृद्ध नागरिकांची संख्या अधिक आहे. तरुण रोजगारानिमित्त शहरांकडे स्थलांतरित झालेला आहे. त्यामुळे गावात वयस्क आणि मुलांची संख्या जास्त असूनही कोरोना गावाबाहेर ठेवण्यात यश आले आहे.
चौकट
कोरोनाचा सर्वाधिक आर्थिक फटका तालुक्याला बसला. चाकरमान्यांचा रोजगार हिरावला गेला. वर्षानुवर्षे जमवलेली पुंजी कोरोनात खर्ची करण्यात आली. त्यामुळे पुन्हा लाॅकडाऊन झाल्यास नागरिकांवर उपासमारीची वेळ येणार आहे.