रत्नागिरी : शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या रमाई आवास योजनेंतर्गत जिल्ह्यासाठी ‘घरकुलांकरिता’ ८ कोटी ४५ लाख ८९ हजाराचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची प्रतीक्षा संपली असून, निधीअभावी अपूर्ण राहिलेल्या घरकुलांचे बांधकाम आता मार्गी लागणार आहे. शासनाकडून मागासवर्गीयासांठी विशेषत: दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांकरिता रमाई आवास योजना राबवण्यात येते. या योजनेंतर्गत नेवरे येथील चार लाभार्थींचे ‘घरकुल’ योजनेसाठी प्रस्ताव मंजूर करण्यात आले होते. पावसाळ्यानंतर सप्टेंबरमध्ये लाभार्थींना मंजुरी मिळाल्यानंतर घरकुलांचे काम सुरू झाले. एका घरकुलासाठी एक लाख रूपये खर्च केला जातो. नोव्हेंबरमध्ये संबंधित लाभार्थ्यांना ग्रामपंचायतीतर्फे निधीचा पहिला हप्ता वितरीत करण्यात आला. चार लाभार्थ्यांना प्रत्येकी ३५ हजार रूपयेप्रमाणे पैसे देण्यात आले. पहिला हप्ता मंजूर झाल्यानंतर लाभार्थींनी घराच्या चौथऱ्याचे बांधकाम पूर्ण केले. चौथरा पूर्ण झाल्यानंतर त्याची छायाचित्र काढून ग्रामपंचायतीकडून पंचायत समितीकडे पाठवण्यात आली. काही लाभार्थ्यांनी भिंतीपर्यंत बांधकाम केले आहे. मात्र, निधी उपलब्ध नसल्यामुळे बांधकाम रखडले. हीच बाब ‘लोकमत’ने उघड केली.वास्तविक रमाई योजनेतंर्गत तीन टप्प्यात निधीचे वाटप करण्यात येते. मात्र, रमाई आवास योजनेतंर्गत गेल्या तीन महिन्यांत शासनाकडून निधी उपलब्ध झालेला नव्हता. त्यामुळे लाभार्थी सातत्याने ग्रामपंचायतीमध्ये फेऱ्या घालत आहेत. ग्रामपंचायतीकडून पंचायत समितीकडे सातत्याने संपर्क साधण्यात येत नव्हता. मात्र, पंचायत समितीकडेही निधीच प्राप्त झाला नसल्याचे कारण सांगण्यात येत होते. ‘लोकमत’ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर जिल्हा परिषदेने हा निधी पंचायत समितीकडे वर्ग करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लाभार्थींना त्याचा लाभ मिळणार आहे.रमाई आवास योजनेंतर्गत घरकूल योजनेसाठी प्रस्तावांची निवड निकषानुसार केली जाते. दारिद्र्यरेषेखालील लाभार्थींना घरकुलासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. गतवर्षी ३८५ लाभार्थींना घरकुलासाठी निधी वितरीत करण्यात आला होता. यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यासाठी २१६५ घरकुलांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
‘घरकुलां’साठी आठ कोटी--लोकमतचा प्रभाव
By admin | Published: March 03, 2015 9:19 PM