रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळामुळे मुसळधार पावसासह प्रामुख्याने रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील तीन हजार ६६५ गावांमधील वीज यंत्रणा कोलमडल्याने १८ लाख ४३ हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. त्यापैकी ८० टक्के ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. चक्रीवादळबाधित उर्वरित ग्राहकांचा वीजपुरवठा सुरु करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करा, असे निर्देश देण्यात आले आहेत. महावितरणचे १३ हजार १७२ कर्मचारी वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी अखंड परिश्रम घेत आहेत.
ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसह २१० पैकी १७३ कोरोना केंद्र व लसीकरण केंद्रांचा वीजपुरवठा काही तासात पूर्ववत करण्यात आला. उर्वरित ठिकाणी वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे. चक्रीवादळामुळे बाधित सात जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक, शहरी व ग्रामीण पाणीपुरवठा योजना, मोबाइल टॉवर्सचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. या जिल्ह्यातील अतिदुर्गम भागासह सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा येत्या ४८ तासांमध्ये सुरू करण्याचे प्रयत्न युध्दपातळीवर सुरू आहेत. मात्र, सिंधुदुर्ग व रत्नागिरीमध्ये रविवारी मध्यरात्रीनंतर अतितीव्र स्वरूप धारण केलेल्या चक्रीवादळामुळे वीजयंत्रणेची सर्वाधिक हानी झाली आहे.
वीजपुरवठा तातडीने सुरू करण्यासाठी महावितरणची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. यासाठी मुंबई मुख्यालय स्तरावर स्वतंत्र नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले असून, तीन मुख्य अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या भागातील अधिकाऱ्यांसमवेत ते वीजपुरवठ्याबाबत समन्वय साधत आहेत. मुख्यालयातील दोन मुख्य अभियंत्यांना सिंधुदुर्ग येथील वीजयंत्रणेच्या कामाची निकड लक्षात घेऊन समन्वय साधण्यासाठी नियुक्त केले आहे. चक्रीवादळ बाधित भागातील महावितरणचे नियमित, बाह्यस्त्रोत कर्मचारी आणि एजन्सीज युध्दपातळीवर दुरुस्तीची कामे करीत आहे.
चक्रीवादळामुळे होणाऱ्या वीजयंत्रणेचे नुकसान लक्षात घेऊनच ६२२ वितरण रोहित्र, ३४७ किलोमीटर वीजवाहिन्या, ३४३९ किलोमीटर वीजतारा, २० हजार ४९८ वीजखांब, १२ मोठी वाहने, ४६ जेसीबी व क्रेन, ३०० दुरुस्ती वाहने संबंधित जिल्ह्यात उपलब्ध असून, मागणीप्रमाणे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहेत. चक्रीवादळामुळे महावितरणचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
....................
आरोग्य यंत्रणेला वीज देण्याबाबत प्राधान्य
रत्नागिरी, सिंधुदुर्गातील वीज समस्यांकडे मुंबईतून लक्ष
समन्वयासाठी तीन मुख्य अभियंत्यांकडे जबाबदारी
दोन दिवसात ८० टक्के काम पूर्ण