रत्नागिरी : तालुक्यातील गावखडी येथे ऑलिव्ह रिडले जातीची समुद्री कासवांची अंडी संरक्षित करण्यात आली आहेत. कासवाच्या घरट्यातून सोमवारी (२० मार्च) ८२ पिले बाहेर येत समुद्रात झेपावली. जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील व राजापूरच्या तहसीलदार शीतल जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पिले समुद्रात सोडण्यात आली.लांबलेला पाऊस आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे यावर्षी ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांच्या विणीचा हंगाम काहीसा लांबला हाेता. त्यातूनही जिल्ह्यातील समुद्र किनारी कासवांची अंडी संरक्षित करण्यात आली आहेत. गावखडी येथे कासवमित्र प्रदीप डिंगणकर यांनी कासवांची घरटी संरक्षित केली आहेत. काही दिवसांपूर्वी मंडणगड तालुक्यातील वेळास याठिकाणी ९ कासवे समुद्रात साेडण्यात आली हाेती. त्यानंतर आता गावखडी येथे ८२ कासवांची पिल्ले समुद्रात साेडण्यात आली.यावेळी जिल्हाधिकारी यांच्या पत्नी स्मिता पाटील, रत्नागिरी प्रादेशिक वन विभागाच्या वनक्षेत्रपाल प्रियंका लगड आणि कर्मचारी उपस्थित हाेते. तसेच रत्नागिरीतील कांदळवन कक्ष, कांदळवन प्रतिष्ठान, मुंबई यांचे कर्मचारी, सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचे नीलेश बापट, गावखडी ग्रामपंचायतीचे सरपंच मुरलीधर तोडणकर, कांदळवन सहव्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष कांचन आंब्रे तसेच पर्यटक, निसर्गप्रेमी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी गावखडी समुद्र किनाऱ्यावर कांदळवन प्रतिष्ठान, मुंबईतर्फे कांदळवन व गावातील जैवविविधतेबाबत माहिती फलक लावण्यात आले आहेत. या फलकाचे अनावरण जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याहस्ते करण्यात आले. कांदळवन कक्षातर्फे गावात जनजागृतीही करण्यात येत आहे. त्याद्वारे कांदळवन संरक्षण आणि कासवांचे संवर्धन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
ऑलिव्ह रिडले जातीच्या मादी कासवाने घरटे बनविल्यानंतर साधारण ५० ते ६० दिवसांनंतर पिले घरट्यातून बाहेर येण्यास सुरुवात होते. यावर्षी विणीचा हंगाम काहीसा लांबला असून, पिले बाहेर येण्यास सुरुवात झाली आहे. मे महिन्यापर्यंत या अंड्यांमधून पिले समुद्रात झेपावतील. - प्रदीप डिंगणकर, कासवमित्र, गावखडी.