रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाने हवामानावर आधारित सुरू केलेल्या फळपीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील १८,५६९ शेतकऱ्यांनी १७ हजार १४ हेक्टर क्षेत्रासाठी फळपीक विमा योजनेचा लाभ घेतला होता. जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदारांना ८४ कोटी ७१ लाख २२ हजार रुपयांचा परतावा जाहीर झाला असून, शेतकऱ्यांच्या खात्यात परताव्याची रक्कम जमा झाली आहे.हवामानावर आधारित असलेल्या फळपीक विमा योजनेंतर्गत केंद्र शासनाने हिश्शाची रक्कम न भरल्यानेच परतावा अद्याप रखडला होता. परंतु यावर्षी जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच भरघोस परतावा शासनाने जाहीर केला आहे.
स्वयंचलित हवामान केंद्राच्या अहवालानुसार शेतकरी लाभार्थी निश्चित करण्यात आले असून, परतावा जाहीर झाल्याने विमा कंपनीकडून खातेदारांची बँकनिहाय यादी जाहीर करून लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात फळपीक परताव्याची रक्कम जमा करण्यास प्रारंभ झाला आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील १८,१९८ आंबा बागायतदारांनी १४,७५५ हेक्टरसाठी ८ कोटी ९२ लाख रुपये प्रीमियम भरला होता. सर्वच्या सर्व आंबा बागायतदारांना परतावा प्राप्त झाला असून, परताव्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे.
१८,१५८ आंबा बागायतदारांच्या खात्यात ८४ कोटी ३३ लाख रुपये जमा झाले आहेत. जिल्ह्यातील २,७४० काजू बागायतदारांनी २,२५९ हेक्टर क्षेत्रावरील विमा उतरविला होता. त्यासाठी ९६ लाख चार हजार प्रीमियम भरला होता. त्यातील केवळ ३७१ शेतकऱ्यांना ३८ लाख २२ हजार परतावा जाहीर झाला आहे. काजू उत्पादक शेतकऱ्यांना मात्र परतावा कमी प्राप्त झाला आहे.गतवर्षी जानेवारीअखेरीस तापमानात मोठी घट झाली होती. मे महिन्यात अवेळी पाऊस झाला होता. मार्च महिन्यातही तापमानात वाढ झाली होती. परिणामी वातावरणातील बदलामुळे उत्पादनावर परिणाम झाला होता. शिवाय कोरोनामुळे आंबा विक्रीवरही परिणाम झाला होता. यंदा शेतकऱ्यांना पहिल्यांदाच भरघोस परतावा प्राप्त झाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.गतवर्षी ऑगस्टमध्ये फळपीक विमा योजनेचा परतावा जाहीर झाला होता. यावर्षी सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना परताव्यासाठी प्रतीक्षा करावी लागली. काजू उत्पादकांमध्ये नाराजी असून, आंबा उत्पादकांना मात्र परताव्याने तारले आहे. सन २०१७ - १८मध्ये जिल्ह्यातील १४,२७८ शेतकऱ्यांना ५५ कोटी १२ लाख ६३ हजार ७०४ रुपयांचा परतावा देण्यात आला.
त्यानंतर यावर्षी ८४ कोटी ७१ लाख २२ हजारांचा परतावा जाहीर झाला आहे. जिल्ह्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात फळपीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना परतावा मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाकडून दिलासा मिळाला आहे.