पाली : मुंबई-गोवा महामार्गावर पालीजवळील खानू (ता. जि. रत्नागिरी) येथे ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दोन मोटारींची समोरासमोर धडक होऊन दोन्हींतील ९ जण जखमी झाले आहेत. शनिवारी सकाळी ६.३० वाजता हा अपघात झाला.
या अपघाताची माहिती अशी की, सकाळी भांडूप मुंबईचे कारचालक पांडुरंग नारायण गवस आपली तवेरा (एमएच०४-एझेड०४०५) घेऊन मुंबईहून कणकवलीकडे चालले होते. त्याचवेळी वेलीवाडी येथील जितेंद्र जयराम सपकाळ बोलेरो पिकअप गाडी (एमएच ०८-डब्ल्यू ३९१८) ही गोव्याच्या दिशेकडून मुंबईच्या दिशेला चालले होते. ते पुढे जात असलेल्या मॅझिको (एम एच ०६ बीजी १९४४) या गाडीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करीत होते. त्यावेळी त्यांच्या बोलेरोची समोरून येणाºया तवेराशी जोरदार धडक झाली. त्यात दोन्ही गाड्यांतील नऊजण जखमी झाले.
तिसरी गाडी रस्त्याच्या डाव्या बाजूला खोलगट भागात जाऊन थांबली होती. या अपघातातील तवेरा कारमधील जखमी असे लहू श्रीधर माने (४२, मालाडपूर्व मुंबई), विनायक मंगेश परब (३६), प्रभाकर सोमा पाताडे (६०), हेमंत परब (४०), विजय चंद्रकांत गायकवाड (३१), तवेरा कारचालक पांडुरंग नारायण गवस (४०, सर्व भांडूप मुंबई)
बोलेरो पिकअप मधील जखमी असे- चालक जितेंद्र जयराम सकपाळ (३३, तेलीवाडी लांजा), नबिसाब हुसनी चिक्काळी (४०) व मैनुद्दिन चिक्काळी (२८, दोघे मुजावरवाडी ता. लांजा).
अपघातात दोन्ही गाड्यांच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला असून त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातील सर्व जखमींना स्थानिक लोकांनी तातडीने गाड्यांतून बाहेर काढले. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच श्रीक्षेत्र नाणीज येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानची हातखंबा येथील रूग्णवाहिका व महाराष्टÑ शासनाची रूग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. त्यातून सर्व जखमींनी रत्नागिरी येथील जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी जमलेले स्थानिक लोक, पाली व हातखंबा येथील पोलिस यांच्या मदतीने सर्व जखमींना तातडीने रूग्णालयात पोहोचवले.
या अपघाताची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास पाली पोलिस दूरक्षेत्रचे पोलिस हेड कॉन्स्टेबल एस. बी. झगडे करीत आहेत.