चिपळूण : जिवंतपणी आपण सामाजिक कार्यात योगदान देतो. मात्र, मरणानंतरही देहाचा उपयोग समाजासाठी व्हावा. या विचाराने तालुक्यातील कुशिवडे येथील विलास डिके यांच्या एकाच कुटुंबातील ९ जणांनी देहदानाचा निर्णय घेतला आहे. आई वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून डेरवण रूग्णालयास देहदान करण्याचा संकल्प डिके कुटुंबियांनी केली.त्याचवेळी डिके यांच्या मित्र परिवारातील तोंडली येथील प्रा. येलये दाम्पत्य, कडवई येथील शिक्षक कडवईकर दाम्पत्य आणि दीपिका जोशी अशा १४ जणांनी एकाचवेळी देहदान करण्याचा निर्णय घेतला आहे.मरणानंतरही आपल्या शरिरातील अवयव गरजूंसाठी उपयोगात यावे, याबाबत तितकीच जागरूकता समाजात झालेली नाही. त्यामुळे एकाचवेळ कुटुबांतील सर्वांनी देहदान करण्याच्या निर्णयावर कुशिवडे येथील विलास डिके म्हणाले की, आम्ही नेहमीच सामाजिक कार्यासाठी योगदान देत असतो. मात्र, मरणानंतरही आमचा देह समाजातील गरजूंच्या उपयोगी पडावा, अशी आमची भावना आहे.मुलगी मुंबईत नर्सिंगचे शिक्षण घेत असतानाच तिने देहदानाचा संकल्प केला होता. आता ती चंद्रपूर येथे नोकरीला असून, देहदानाचे महत्त्व ती समजावून सांगते. देहदान करण्याबाबत कुटुबातील सर्व व्यक्तींशी चर्चा झाली. मरणानंतर देह जळून खाक होण्यापेक्षा आपल्या शरिरातील अवयक एखाद्या गरजूंच्या कामी आले, तर या देहाचे अधिक सार्थक होईल. या विचार कुटुंबातील सर्वांना पटला. त्यानुसार विलास डिके यांच्या पत्नी व मुले, भावाची पत्नी व मुले, आई - वडील अशा ९ जणांनी देहदान करण्याचा निर्णय घेतला.आई वडिलांच्या विवाहाचा वाढदिवस १९ फेब्रुवारी राेजी हाेता. मात्र, शिवजयंत्तीमुळे २० फेब्रुवारी राेजी घरगुती कार्यक्रम घेत देहदानाचे अर्ज् भरण्यात आले. याचवेळी तोंडली येथील प्रा. संदीप येलये, शिल्पा येलये, कडवई येथील शिक्षक मिलींद कडवईकर, मिताली कडवईकर आणि म्हाबळे येथील दीपिका जोशी यांनी देहदानास संमत्ती दिली.यावेळी देवरूख येथील युयुत्सु आर्ते, साखरपा येथील काका जोशी, सुरेश भायजे, डेरवण रूग्णालयाचे डॉ. अविनाश शेवाळे, स्वरा चव्हाण, कोंडमळा सरपंच रमेश म्हादे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या रसिका म्हादे उपस्थित होते.
चिपळूण तालुक्यातील एकाच कुटुंबातील ९ जणांनी केला देहदानाचा संकल्प, मित्र परिवारानेही घेतला पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 6:50 PM