रत्नागिरी : ‘जुनी पेन्शन योजना सुरू करा’ या मागणीवर ठाम राहून राज्य सरकारी कर्मचारी बेमुदत कामबंद आंदोलनात गेले दोन दिवस सक्रीय आहेत. शिक्षक संघटनांनीही आंदोलनात सहभागी आहेत. मात्र बुधवारी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा बोर्डाचा पेपर असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी जिल्ह्यातील ९२२ शिक्षक परीक्षेच्या कामासाठी हजर होते.‘एकच मिशन-जुनी पेन्शन’ यासाठी राज्यसरकारी कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. विविध शासकीय कर्मचाऱ्यांसह प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यीन शिक्षक आंदोलनात सहभागी झाले आहेत. दहावी, बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शिक्षक परीक्षेच्या कामासाठी परीक्षा केंद्रावर उपस्थित होते. सकाळच्या सत्रात दहावीचा पेपर असल्याने परीक्षेसाठी जिल्ह्यात ७३ केंद्र असून १९,९८३ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. परीक्षा केंद्रावर ८७२ पर्यवेक्षक, २२ कस्टोडियन कार्यरत होते. दुपारच्या सत्रात बारावीचा पेपर होता जिल्हयात नऊ केंद्रावर ४७४ विद्यार्थी बसले होते. २३ पर्यवेक्षक व पाच कस्टोडियन कार्यरत होते.महराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशनच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ कामबंद आंदोलनात सहभागी झाल्याने बहुसंख्येने शिक्षक आंदोलनात सक्रीय आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी परीक्षा कामकाजात सहभाग दर्शविला असून परीक्षेच्या वेळेत केंद्रावर उपस्थित होते. मात्र पेपर स्विकारण्यासह तपासण्याच्या कामाला नकार दर्शविला आहे. संप काळात जेव्हा परीक्षा असेल तेव्हा परीक्षा कामकाजासाठी नियुक्त शिक्षक कार्यरत राहणार असल्याचे शिक्षकांनी कळविले आहे.
Ratnagiri News: दहावी, बारावी परीक्षेसाठी ९२२ शिक्षक हजर; कामबंद आंदोलनात शिक्षक संघटनांनीही सहभागी
By मेहरून नाकाडे | Published: March 15, 2023 7:18 PM