रत्नागिरी : ई पीक पाहणी ॲपव्दारे पीक पेरा नोंदणी उपक्रम राज्य शासनाकडून राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील ९३ हजार ७९६ शेतकऱ्यांनी पीक पाहणी ॲपवर नोंदणी केली आहे.
सातबारा उताऱ्यावर दरवर्षी शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या पिकाची नोंदणी तलाठी, मंडल अधिकारी यांच्यातर्फे करण्यात येते. राज्य शासनातर्फे यावर्षी ‘ई पीक पाहणी ॲपव्दारे पीकपेरा नोंदणी उपक्रम’ राबविताना, शेतकऱ्यांना पिकाची अचूक माहिती देणे बंधनकारक केले आहे. या ॲपव्दारे शेतकरी स्वत:च्या ॲण्ड्राईड मोबाइल फोनवरून स्वत: भरावी अशी सूचना केली होती. त्यानुसार प्रत्यक्ष कार्यवाही जिल्हाभरात करण्यात आली. शेतजमिनीचा गट, खातेनंबर, पिकांची माहिती, हंगामनिहाय पिके, पिकांची छायाचित्रे आदी तपशील शेतकऱ्यांनी ॲपमध्ये भरावयाच्या आहेत. मोहिमेच्या सुरुवातीला ग्रामीण भागात नेटवर्क समस्या, मोबाइल रेंज नसल्यामुळे ॲपवरील नोंदणीसाठी अडचण येत होत्या. अनेक शेतकऱ्यांकडे तर ॲण्ड्राईड मोबाइल नसल्याने ॲपवर माहिती नोंदविणे अशक्य झाले होते.
मात्र, या समस्येवर मात्र करताना, ग्रामीण भागातील युवकांनी शेतकऱ्यांना मदत केली. समस्या असलेल्या गावातून तर ॲपवरील नोंदणीसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती. एका मोबाइलवरून २० शेतकऱ्यांच्या सातबाराची नोंदणी करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पाच लाखाहून अधिक शेतकरी खातेदार आहेत, त्यापैकी ९३ हजार ७९६ शेतकऱ्यांनी पहिल्या टप्प्यात ॲपवर नोंदणी करून महसूल, कृषी विभागाला आवश्यक असलेली माहिती भरून दिली आहे.
ऑनलाईन नोंदणीसाठी ३१ पर्यंत मुदतवाढ
यावर्षी भात पीक खरेदीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणीचे आवाहन करण्यात आले होते. मात्र अनेक शेतकऱ्यांनी नोंदणी न केल्यामुळे त्यांना भात खरेदी करणे शक्य नव्हते. मात्र शेतकऱ्यांचे त्यामुळे नुकसान होणार असल्याने शासनाकडून पुन्हा दि. ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. वास्तविक ‘ई पीक पाहणी ॲपव्दारे पीक पेरा नोंदणी उपक्रम’ राबविताना, शेतकऱ्यांना पिकाची अचूक माहिती देणे बंधनकारक केले आहे. त्यामध्ये सातबारासह शेतातील पिकाचा फोटो डाऊनलोड करणे आवश्यक आहे. मात्र भात काढणी ऑक्टोबरमध्येच काढण्यात आल्याने शेतकऱ्यांपुढे समस्या निर्माण झाली आहे.