रत्नागिरी : जिल्ह्यात सुमारे २ हजार शिक्षकांची रिक्त पदे असतानाही पवित्र पोर्टलद्वारे १ हजार ६८ शिक्षकांची भरती करण्यात येत आहे. त्यातही ५४ उमेदवार अनुपस्थित राहल्याने आता केवळ १ हजार १४ शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे शिक्षक भरतीनंतरही जिल्ह्यात ९८६ पदे रिक्त राहणार आहेत. त्यामुळे उर्वरित शिक्षकांची रिक्त पदे कधी भरणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.शासनाने शिक्षक भरती करणार हे जाहीर केल्याप्रमाणे अखेर शिक्षक भरतीला मुहूर्त सापडला. गेली अनेक वर्षे शिक्षक भरती झालेली नाही. त्यातच आंतरजिल्हा बदलीने जाणाऱ्या शिक्षकांची संख्याही फार मोठी असल्याने दरवर्षी शिक्षकांच्या रिक्त पदांचा आलेख वाढत चालला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची ओरड पालकांकडून सुरू होती; तसेच शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात यावीत, अशी मागणीही पालकांकडून वेळोवेळी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे करण्यात आली आहे.
शिक्षकांच्या रिक्त जागांमुळे शिक्षणाचा बट्ट्याबाेळ झालेला असतानाच शिक्षक भरतीचा मुहूर्त काढण्यात आला. जिल्ह्यात २ हजार शिक्षकांची रिक्त पदे असताना १ हजार ०६८ शिक्षकांची भरती करण्यात येत आहे. त्यातही ५४ उमेदवारांनी पडताळणीला दांडी मारल्याने आता केवळ १ हजार ०१४ पदांवर भरती हाेणार आहे. त्यामुळे ९८६ पदे रिक्तच राहणार आहेत. त्यामुळे पुन्हा रिक्त पदांचा घाेळ आहेच.
आधी बदली प्रक्रिया करावीशिक्षक भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे वेगवेगळ्या शिक्षक संघटनांनी नव्या उमेदवारांना रिक्त शाळा देण्यापूर्वी कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षकांची जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी शासनाकडे केली आहे.
संधी देऊनही उमेदवारांचे दुर्लक्षकागदपत्र तपासणीमध्ये ५५ उमेदवार विविध कारणांनी अनुपस्थित राहिले. त्यांना कागदपत्र तपासणीसाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून मुदतवाढ दिली होती; मात्र अनुपस्थितांपैकी केवळ एकच उमेदवार उपस्थित राहून कागदपत्रे सादर केली. जिल्हा परिषदेकडून संधी देऊनही उमेदवारांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
शिक्षक भरतीतील नियमांची उमेदवारांना योग्य माहिती द्यायला हवी होती. मात्र, मागासवर्गीय उमेदवारांवर अन्याय झाला आहे. टीईटी परीक्षेत खुल्या प्रवर्गाचे आरक्षण घेणारा उमेदवार भरतीमध्ये खुल्या प्रवर्गाचे आरक्षण घेऊ शकला. हा नियम भरतीआधी सांगितला गेला नाही. त्यामुळे स्वरूप मागासवर्गाचे मेरीट जास्त लागले. मात्र, आयुक्त यावर योग्य तोडगा काढून अन्याय दूर करतील. - संदेश रावणंग, बेरोजगार डी.एड.धारक