राजापूर : तालुक्यात आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावरच शिंदे गटाने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला दणका दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रशांत गावकर यांच्यासह अणसुरेचे ग्रामपंचायत सदस्य सत्यवान आडिवरेकर तसेच मोरोशी, गोवळ व राजापूर शहर व परिसरातील शेकडो शिवसैनिकांनी गुरुवारी (१७ नाेव्हेंबर) शिंदे गटात प्रवेश केला आहे.
जिल्ह्यातील खेड, दापाेली, गुहागर, मंडणगड या भागात ठाकरे गटातील अनेकजण शिंदे गटात दाखल झाले हाेते. आता राजापुरातही ठाकरे गटाच्या शिवसेनेला खिंडार पडले आहे. बाळासाहेब ठाकरे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राहुल पंडित, रत्नागिरीतील उद्योजक किरण सामंत व प्रशांत सुर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी प्रवेश झाला. अश्फाक हाजू, सौरभ खडपे यांच्या नेतृत्वाखाली अनेकांनी पक्षात प्रवेश केला.
बाळासाहेब ठाकरे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राहुल पंडित, किरण सामंत गुरुवारी राजापुरात आले होते. यावेळी त्यांनी राजापुरातील पक्ष संघटना कामाचा आढावा घेतला. तसेच विकासकामांबाबत चर्चा केली. त्यानंतर अश्फाक हाजू यांच्या कार्यालयात हा पक्ष प्रवेश झाला.
प्रशांत गावकर यांच्यासह सत्यवान आडिवरेकर, केळवलीचे बाळकृष्ण तानवडे, मोसम सरपंच सर्वेश गुरव, सुरेखा तावडे, एकनाथ तावडे, मोहन तावडे, पुंडलिक सर्वणकर, अजित घाणेकर, मोरोशीतील संतोष नारकर, सदानंद नारकर, अशोक कानडे, वैभव तांबे, राजापूर शहरातील अभिषेक खंडे, रोहिदास खानविलकर, गोवळ येथील संदेश कदम, सुरज शिंदे, गौरव शिंदे, विनायक चव्हाण आदींसह शेकडो जणांनी शिंदे गटात प्रवेश केला.
यावेळी राजापूरचे माजी नगरसेवक विजय हिवाळकर, भरत लाड यांच्यासह ठेकेदार तसेच शिंदे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी रिफायनरी समर्थकांनीही किरण सामंत यांची भेट घेतली. यामध्ये पंढरीनाथ आंबेरकर, अॅड. यशवंत कावतकर, महेश शिवलकर, राजा काजवे, सुनील भणसारी, डॉ. सुनील राणे, हनिफ मुसा काझी आदी उपस्थित होते.
यावेळी प्रशांत गावकर यांनी आपल्या गावातील रस्ता गेली दहा वर्षे झाला नाही, केवळ विकासाची पोकळ आश्वासनेच मिळाली. त्यामुळे भविष्यातील विकास डोळ्यासमोर ठेऊन आपण शिंदे गटात प्रवेश करत असल्याचे सांगितले. तर भविष्यातील ही पक्ष संघटना वाढीची सुरूवात असून, भविष्यात राजापुरात बाळासाहेब ठाकरे शिवसेना शिंदे गट अधिक मजबूत होणार असल्याचे पंडित व सामंत यांनी सांगितले.