राजापूर : निवडणूक आयोगाने परवानगी नाकारलेली असतानाही वचननामा पत्रके वाटल्याप्रकरणी राजापूर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अमृत तांबडे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आचारसंहिता भंगाचा जिल्ह्यातील हा दुसरा गुन्हा आहे. यापूर्वी चिपळूणमध्ये साेशल मीडियावर आक्षेपार्ह पाेस्ट टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पाेलिस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी माहिती दिली. अमृत अनंत तांबडे यांनी आपला जाहीरनामा तयार केला असून, तो प्रसिद्धी करण्याची परवानगी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे मागितली होती. मात्र, या जाहीरनाम्यातील काही मुद्दे हे गैर असल्याने राजापूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी तो प्रसिद्ध करण्यास, तसेच मतदारांमध्ये वाटण्यास परवानगी नाकारली होती. त्यानंतरही अमृत तांबडे यांनी या जाहीरनाम्याचे प्रसिद्धीपत्रक मतदारांमध्ये वाटले व त्याची जाहिरातही केली आहे.या प्रकरणी निवडणूक नोडल अधिकारी जितेंद्र जाधव यांनी अमृत अनंत तांबडे यांच्या विरोधात राजापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ चे कलम १२७ (ए) भारतीय न्याय संहिता कलम २२६ अन्वये आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजापुरात अपक्ष उमेदवारावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 11:57 AM