खेड (जि. रत्नागिरी) : येथील नगर परिषदेच्या ठरावातील मूळ मजकुरात बदल करून महत्त्वाच्या तपशिलाव्यतिरिक्त अधिकच्या मजकुराची नोंद घेत खोटा दस्तऐवज तयार केल्याचा ठपका खेडचे तत्कालीन नगराध्यक्ष तथा मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव सदानंद खेडेकर यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी खेड पोलिस स्थानकात शनिवारी (२१ ऑक्टाेबर) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.खेड नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या आदेशानुसार कर्मचारी रूपेश एकनाथ डंबे यांनी खेड पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे. हा प्रकार डिसेंबर २०१६ ते डिसेंबर २०२१ या कालावधीत घडला आहे. या कालावधीत खेडचे नगराध्यक्ष असताना वैभव खेडेकर यांनी नगर परिषदेच्या ठरावातील मूळ मजकुरात असलेल्या महत्त्वाच्या तपशिलाव्यतिरिक्त अधिकच्या मजकुराची नोंद घेतली हाेती. त्यानंतर खोटा दस्तऐवज तयार करून हा दस्तऐवज खरा असल्याचे भासविले हाेते.
रामदास कदमांकडून पाठपुरावामाजी मंत्री रामदास कदम यांनी खेड नगर परिषदेत भ्रष्टाचार झाल्याचा आराेप केला हाेता. त्याबाबत त्यांनी कागदपत्रेही सादर केली हाेती. नगर परिषदेतील ठरावात बदल करण्यात आल्याचा आरोप त्यांनी २०२१ मध्ये केला हाेता. त्यानंतर सातत्याने त्यांनी तत्कालीन नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी उचलून धरली हाेती. त्यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू हाेता.