रत्नागिरी : खाेटे साेने ठेवून बँका आणि पतसंस्थांची फसवणूक करणाऱ्या टाेळीचा पर्दाफाश झाल्यानंतर आणखी एक फसवणुकीचा गुन्हा समाेर आला आहे. बँक ऑफ इंडियाच्या पूर्णगड शाखेत ४४८.३०० ग्रॅम वजनाचे दागिने ठेवून १८ लाख २१ हजारांची फसवणूक केल्याचे पुढे आले आहे. याप्रकरणी कोल्हापुरातील सोनारासह त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.काेल्हापुरातील साेनार अमाेल गणपती पोतदार (४७, रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर), अमेय सुधीर पाथरे (३४, रा. खांबडवाडी-पावस, रत्नागिरी), प्रभात गजानन नार्वेकर (३२, रा. काेल्हापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. राजापूर तालुक्यातील मिठगवाणे येथील पतसंस्थेतील चोरीचा तपास सुरू असताना खोटे दागिने गहाण ठेवून त्याद्वारे कर्ज प्रकरण मंजूर करून फसवणूक करणाऱ्या टोळीचा तपास पोलिसांना लागला.त्यानंतर पोलिसांनी अमाेल पोतदार, अमेय पाथरे, प्रभात नार्वेकर आणि योगेश पांडुरंग सुर्वे (रा. तुळसुंदे, राजापूर) यांना अटक केली. या टोळीने रत्नागिरी जिल्ह्यातील भंडारी खारवी समाज पतसंस्था, मलकापूर अर्बन बँक, खंडाळा अर्बन, राजापूर कुणबी पतसंस्था, बँक ऑफ इंडिया, राजापूर आणि श्रमिक पतसंस्था, मिठगवाणे येथे फसवणूक केल्याचे पुढे आले हाेते.
मात्र, या टाेळीतील तिघांनी पूर्णगड येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेतही खोटे दागिने ठेवून कर्ज घेतल्याचे तपासात पुढे आले आहे. अमेय पाथरे, अमाेल पोतदार आणि प्रभात नार्वेकर यांनी संगनमताने ४४८.३०० ग्रॅम वजनाच्या १३ चेन व २ ब्रेसलेट, असे दागिने गहाण ठेवून १८ लाख २१ हजारांची फसवणूक केल्याचे पुढे आले आहे. याप्रकरणी पूर्णगड सागरी पोलिस स्थानकात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिल्लीतून मागविले खोटे दागिनेकोल्हापूर येथील सोनार अमोल पोतदार हा दिल्लीतून ऑनलाइन खाेटे दागिने मागवत हाेता. त्यावर सोन्याचा मुलामा देऊन रत्नागिरीतील दोघांना हाताशी धरून पतसंस्था, बँकांमध्ये गहाण ठेवून कर्ज घेत हाेता. त्यामधील सोनाराला तोळ्याला २० हजार, तर उर्वरित २५ हजार दाेन साथीदारांना मिळत हाेते. या टोळीने कोट्यवधींची फसवणूक केल्याचे पुढे आले आहे.