चिपळूण : तालुक्यातील मिरजोळी येथील दत्त एजन्सी दुकानात जेएसडब्ल्यू कंपनीचा बनावट पत्रा विक्रीस ठेवल्याप्रकर्णी दत्त एजन्सीचे मालक दयाळ वसंत उदेग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाखोंचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे. यासंदर्भात हंबीरराव साठे यांनी चिपळूण पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. मिरजोळी येथे दत्त एजन्सी हे बिल्डिंग मटेरियल हार्डवेअरचे मोठे दुकान आहे. याठिकाणी जेएसडब्ल्यू कंपनीचे कलर कोटेड पत्रे विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. मात्र हे पत्रे मूळ कंपनीचे उत्पादन नसून बनावट असल्याचा संशय फिर्यादी यांना आल्यानंतर त्यांनी यासंदर्भात खातरजमा केली आणि थेट चिपळूण पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली. त्यानुसार चिपळूण पोलिसांनी कारवाई केली आहे.फिर्यादीनुसार कलम ४८६ तसेच कॉपी राईट ऍक्ट १९५७ चे कलम ५१,६३ नुसार दयाळ वसंत उदेग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सुमारे लाखो रुपये किमतीचे ८३ पत्रे असा मुद्देमाल देखील पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईमुळे चिपळूणमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अधिक तपास चिपळूण पोलीस करत आहेत.
Ratnagiri: जेएसडब्ल्यू कंपनीचा बनावट पत्रा विक्रीस ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल, लाखोंचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 5:46 PM