रहिम दलाल रत्नागिरी : जुन्या पेन्शनच्या मागणीबाबत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी लवकरच राज्यस्तरावर एक समिती नेमण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्राथमिक शिक्षक संघाच्या रत्नागिरीतील राज्यस्तरीय मेळाव्यामध्ये केली. शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठीही राज्यस्तरावर समिती नेमली जाईल, असे त्यांनी सांगितले.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा मेळावा शुक्रवारी रत्नागिरीत झाला. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांसमवेत उद्योगमंत्री, रत्नागिरीचे पालकमंत्री आणि मेळाव्याचे स्वागताध्यक्ष उदय सामंत, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, संघटनेचे नेते संभाजीराव थोरात यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.जिथे कोणीही पोहोचत नाही तिथे शिक्षक पोहोचतो, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी शिक्षकांचे कौतुक केले. भारत तरुणाईचा देश आणि ही तरुणाई घडविण्याचे काम शिक्षक करीत आहेत. मी स्वतः जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी आहे. मात्र तेव्हाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती यात बदल आहे. अर्थात तंत्रज्ञान कितीही बदलले, तरी शिक्षक- विद्यार्थी यांच्यातील नाते कधीही बदलू शकणार नाही. शिक्षकांची जागा कोणीही घेऊ शकणार नाही, असे ते म्हणाले.जे होणार असेल, तेच आपण बोलतो, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी जुन्या पेन्शन बाबतचे सकारात्मक निर्णय घेण्यासाठी राज्यस्तरावर समिती नेमण्याची घोषणा केली. शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठीही राज्यस्तरावर समिती नेमली जाईल आणि त्याचा आढावा घेतला जाईल, असे ते म्हणाले.
जुन्या पेन्शनच्या मागणीबाबत राज्यस्तरीय समिती नेमणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
By रहिम दलाल | Published: February 17, 2023 4:43 PM