चिपळूण : सात वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाल्यानंतर दोन्ही बाजूच्या घरच्यांनी नाकारले. सासर-माहेर दोन्हीकडचे नाते तुटले. मात्र तरीही न डगमगता शरद पाटील व स्वाती पाटील यांनी कोल्हापूर सोडून थेट चिपळूण गाठले. हमाली व धुण्याभांड्याची कामे करून दोघांनी आपला संसार रेटण्याचा प्रयत्न केला. परंतु शेवटी दोघेही हरले आणि नाइलाजाने परिस्थिती पुढे हात ठेवत दोघांनीही आपल्या प्रेमाचा शेवट आत्महत्येने केला. पती शरद पाटील यांचा मृतदेह घरात, तर पत्नी स्वाती यांचा मृतदेह नदीत सापडला आहे. या घटनेने चिपळूण शहर हादरले.शरद शिवगोंड पाटील (४२) व स्वाती शरद पाटील (४०, दोघेही सध्या राहणार पिंपळी) यांनी एकाचवेळी आत्महत्या केल्याची घटना येथे मंगळवारी घडली. हे दाम्पत्य मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील हलसवडे गावचे रहिवासी होते. शाळेत असतानाच ते एकमेकांच्या प्रेमात पडले. ७ वर्षांपूर्वी त्याचा प्रेमविवाह झाला.
मात्र हा प्रेमविवाह त्यांच्या नातेवाइकांना मान्य नव्हता. त्यांनी या लग्नाबाबत नकारात्मक भूमिका घेतल्याने या दोघांनी कोल्हापूर सोडून चिपळूण गाठले. चिपळूण कराड रस्त्यावरील पिपळी येथील सुर्वे यांच्या चाळीत भाड्याने राहण्यास सुरुवात केली. नातेवाइकांनी त्यांच्याकडे येणे जाणे पूर्णपणे बंद केले होते.घरच्यांनी साथ सोडली असली तरी एकमेकांच्या साथीने त्यांनी नवे जीवन सुरू केले. स्वाती यांचे एम.ए., बी.एडपर्यंतचे शिक्षण झाले होते. शरद पाटील यांचे अकरावीपर्यंत शिक्षण झाले आहे. स्वाती यांनी काहीकाळ गावात शिक्षक म्हणून नोकरी केली होती. प्रेमविवाहामुळे चिपळुणात आल्यानंतर शरद यांनी हमालीचे काम, तर स्वाती यांनी चार घरातील धुणीभांडी करून संसार फुलवला.
सारे काही सुरळीत सुरू असतानाच वर्षभरापूर्वी शरद यांना मणक्याचा त्रास सुरू झाला आणि काही दिवसात त्यांच्या कमरेखाली हालचाली बंद झाल्या. त्यामुळे अपंगत्व आलेल्या शरद पाटील यांचे काम थांबले. त्यातून दोघांमध्ये नैराश्य निर्माण झाले. अखेर आजाराला कंटाळून शरद पाटील यांनी घरातच आत्महत्या केली, तर त्याचवेळी स्वाती यांनी नजीकच्या कॅनॉलमध्ये उडी घेऊन जीवन संपवले. त्यांचा मृतदेह वाशिष्ठी नदी पात्रात बहादूरशेख पूल येथे आढळला. त्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी पिंपळी परिसरात चौकशी केली तेव्हा त्यांच्या पतीनेही आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले.कामथे उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून बुधवारी दुपारी नातेवाइकांच्या उपस्थितीत शहरातच अंत्यसंस्कार झाले. सहायक पोलिस उपनिरीक्षक अविनाश महाडिक अधिक तपास करत आहेत.