चिपळूण : चिपळूणच्या परशुराम घाटात महामार्गाला तसेच पेढे गावाला संरक्षण म्हणून उभारण्यात आलेली संरक्षक भिंत पुन्हा एकदा बुधवारी पहाटे कोसळली. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. रस्ता सुरक्षित असला, तरी निर्माण झालेली धोकादायक परिस्थिती बघता तेथील एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली आहे.प्रचंड डोंगर कटाई करून परशुराम घाटातून महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आले आहे. येथे डोंगर खचणे व दरड कोसळणे हे नित्याचे बनले होते. अशा परिस्थितीत चौपदरीकरण करण्यात आले. त्यावेळीही अनेकदा दरड कोसळली, जीवितहानीही झाली. पायथ्याशी असलेल्या पेढे गावाला धोका निर्माण झाल्यामुळे येथे सुमारे दीडशे मीटरहून अधिक लांबीची संरक्षक भिंत उभारण्यात आली. पण, आता त्याच संरक्षक भिंतीमुळे धोका निर्माण झाला आहे. पावसाच्या सुरुवातीलाच जुलै महिन्यात संरक्षक भिंतीचा एक भाग कोसळला होता.मंगळवारी रात्री परतीच्या पावसाने चिपळूणला चांगलेच झोडपले. बुधवारी पहाटे ५:०० वाजता मोठा आवाज करत रस्त्याच्या कडेच्या मातीसह संरक्षक भिंतीचा मोठा भाग कोसळला. या आवाजानेच परिसरात भीतीचे वातावरण पसरले. सुदैवाने खाली असलेल्या पेढे गावाला धोका पोहोचलेला नाही. भिंत कोसळल्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, पोलिस निरीक्षक मेंगडे, तसेच राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी, ठेकेदार प्रतिनिधी तेथे दाखल झाले. मुंबई - गोवा महामार्ग सुरक्षित असला तरी येथे निर्माण झालेली परिस्थिती पाहता एका बाजूची वाहतूक तत्काळ बंद करण्यात आली असून, एका बाजूने वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे.
मोबाइलची रेंज गेलीभल्या पहाटे मोबाइलची रेंज अचानक गेल्याने बीएसएनएल अधिकाऱ्यांनी माहिती घेण्यास सुरुवात केली तेव्हा कुठेतरी केबल ब्रेक असल्याची माहिती मिळाली. त्या ब्रेक केबलचा शोध घेत असतानाच परशुराम घाटात संरक्षक भिंत कोसळली आणि त्यामध्ये केबल तुटल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अधिकाऱ्यांनी तत्काळ चिपळूण पोलिस व राष्ट्रीय महामार्गाला याची माहिती दिली.