रत्नागिरी : राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नामुळे रत्नागिरी पोलिस अधीक्षक कार्यालयासह पाेलिसांसाठी २२२ निवासस्थाने असलेल्या भव्य संकुलाचे स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. यासाठी १२९ कोटी ९० लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या कामांसाठी निविदा काढण्यात आली आहे. त्यामुळे पोलिस वसाहतीचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे.सध्या पोलिस रहात असलेल्या इमारती १९३५ सालच्या आहेत. या इमारती धोकादायक झाल्याने यामध्ये रहाणाऱ्या कर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरून रहावे लागत होते. त्यामुळे या जुन्या धोकादायक इमारतींच्या दुरूस्तीचा प्रश्न एेरणीवर आला होता. या इमारतीत रहाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून या इमारतींच्या दुरूस्तीचा प्रस्ताव २०१० साली शासनाकडे पाठविण्यात आला होता. यासाठी शासस्तरावर पाठपुरावाही केला जात होता.अखेर रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नामुळे पोलिसांच्या नव्या वसाहतींचा तसेच पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या दुरूस्तीचा प्रश्न संपुष्टात आला आहे. पोलिसांच्या या नव्या संकुलासाठी १२९ कोटी ९० लाखांचा निधी मिळाला आहे. या नव्या संकुलात पोलीस अधिक्षक कार्यालय, एक राखीव पोलीस निरीक्षक कार्यालय व तीन निवासी इमारती प्रस्तावित आहेत.पोलिसांसाठी एकूण २२२ निवासस्थाने प्रस्तावित असून पोलीस अधिकारी यांच्या करिता एकूण ६ व पोलीस अंमलदार यांच्या करिता २१६ निवासस्थाने होणार आहेत. प्रत्येकी ७२ निवासस्थाने असणाऱ्या १२ मजल्याच्या ३ इमारती उभ्या रहाणार आहेत.
रत्नागिरीत साकारणार पोलिसांचे भव्य संकुल, १२९ कोटी ९० लाखांचा निधी मंजूर
By शोभना कांबळे | Published: April 11, 2023 6:46 PM