मंडणगड : तालुक्यातील देव्हारे आतले मार्गावर फासकीत अडकलेल्या बिबट्याला वन विभागाने जीवनदान दिले. बुधवार २८ सायंकाळी हा प्रकार घडला.२८ डिसेंबर रोजी दुपारी ४.३० वाजता मंडणगडचे वनपाल अनिल दळवी यांना देव्हारे येथील ग्रामस्थ श्रीधर खैर यांनी देव्हारे आतले रस्त्यालगत काजू बागायतीमध्ये फासकीत बिबट्या अडकला असल्याची माहिती दिली. त्यामुळे वनपाल मंडणगड व वनरक्षक देव्हारे यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. हा बिबट्या दोन ते वर्षाचा नर जातीचा होता.दळवी यांनी याबाबत परिक्षेत्र वनअधिकारी दापोली वैभव बोराटे तसेच वनपाल दापोली, वनपाल खेड यांना याबाबत सूचित केले. खेडचे वनपाल तत्काळ लोखंडी पिंजरा व वन्यप्राणी बचाव साहित्य घेऊन घटनास्थळी दाखले झाले. वन्यप्राणी बचाव पथकाने लोखंडी पिंजरा लावून फासकीत अडकलेल्या बिबट्याला सुरक्षित ताब्यात घेतले. त्यानंतर पिंजऱ्यासह बिबट्यास मंडणगड येथे आणून पशुधन विकास अधिकारी मंडणगड यांच्याकडून बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून घेण्यात आली.या प्रकरणी वनपाल मंडणगड यांनी अज्ञात व्यक्तीविरोधात वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल केला असून, गुन्ह्याचा पुढील तपास दापोलीचे परिक्षेत्र वनअधिकारी बोराटे करीत आहे. या कारवाईत विभागीय वनअधिकारी रत्नागिरी दीपक खाडे, सहाय्यक वनरक्षक रत्नागिरी सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली परिक्षेत्र वनअधिकारी बोराटे, मंडणगडचे वनपाल अनिल दळवी, खेडचे वनपाल सुरेश उपरे, दापोलीचे वनपाल सावंत तसेच देव्हारे व पालघरचे वनरक्षक सहभागी झाले होते.
फासकीत बिबट्या अडकला असल्याचे वृत्त तालुक्यात वाऱ्यासारखे पसरले. यामुळे असंख्य बघ्यांनी देव्हारे परिसरात एकच गर्दी केली होती.