चिपळूण : तालुक्यात सह्याद्री डोंगररांगांच्या पायथ्याशी असणाऱ्या नांदिवसे ग्रामपंचायतीमधील राधानगरवाडीच्या वरील डोंगराला २०० मीटरची भेग पडली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून दहा कुटुंबांतील ४० जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे. तसेच एनडीआरएफच्या माध्यमातून प्रशासनाने येथील बारीक हालचालींवर लक्ष ठेवले आहे.तीन वर्षांपूर्वी तालुक्यातील दसपटी विभागातील तिवरे येथे धरण फुटीची घटना घडली होती. या दुर्घटनेत तब्बल २२ जणांचा बळी गेला होता. त्याचवेळी या विभागातील अनेक डोंगराना भेगा पडल्या होत्या. मात्र, आता पुन्हा या भागात डोंगर खचून भेगा पडू लागल्या आहेत. याच विभागात सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या नांदिवसे-राधानगर येथील गावाच्या वरील डोंगराला असलेल्या स्वयंदेव वाकरी धनगरवाडी येथे मोठी भेग गेली आहे. साधारण २०० मीटर लांबीची व एक मीटर रुंदीची भेग पडली आहे. याविषयी नांदिवसेच्या तलाठ्यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला माहिती दिली. त्यानुसार हालचाली सुरू केल्या आहेत.गेले काही दिवस कोकणात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात एनडीआरएफची पथके आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आधीच तैनात करण्यात आली आहेत. त्याप्रमाणे चिपळूण येथील एनडीआरएफच्या पथकाला या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या डोंगराला यापूर्वीच भेग पडली होती. मात्र, यावेळच्या पावसामुळे ती अधिक रुंदावली आहे.
याबाबत माहिती मिळताच चिपळूणचे प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी नांदिवसे येथे जाऊन पाहणी केली व ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. डाेंगराच्या पायथ्याशी असलेल्या राधानगरवाडीतील धोक्याच्या छायेत असलेल्या दहा कुटुंबांचे तत्काळ जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी व काही घरांमध्ये स्थलांतर केले. तसेच स्वयंदेव येथील १९ कुटुंबांनाही सुरक्षितस्थळी हलवले आहे. गावचे तलाठी नंदगवळी व ग्रामसेवक हांगे यांच्यामार्फत गावात जनजागृती केली जात आहे.